रशियाकडून ‘नॉर्ड स्ट्रीम२’मध्ये इंधनवायू भरण्याची प्रक्रिया सुरू

मॉस्को – अमेरिकेसह युरोपिय महासंघातील प्रमुख देशांचा विरोध असतानाही रशियाने पूर्ण केलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीत नैसर्गिक इंधनवायू भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. युरोपमध्ये ‘एनर्जी क्रायसिस’ सुरू असताना ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरते. गेल्याच महिन्यात रशियाच्या ‘गाझप्रोम’ कंपनीने ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीची उभारणी पूर्ण झाल्याची घोषणा केली होती.

रशियाकडून ‘नॉर्ड स्ट्रीम२’मध्ये इंधनवायू भरण्याची प्रक्रिया सुरू२०१४ साली क्रिमिआ ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनबरोबर पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाने युरोपला इंधनपुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यातून ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून रशिया व जर्मनीतील महत्त्वाकांक्षी ‘नॉर्ड स्ट्रीम२’ही आता पूर्ण झाला आहे. सुमारे १२३० किलोमीटर लांबीच्या या इंधनवाहिनीच्या माध्यमातून युरोपिय देशांचा इंधनपुरवठा ११० अब्ज घनमीटरपर्यंत वाढविण्याची ग्वाही रशियाकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या इंधनवाहिनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन निर्बंध लादले होते. युरोपिय महासंघातील फ्रान्स, पोलंड यासारख्या प्रमुख देशांसह युक्रेननेही या प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता. पोलंडने युरोपिय महासंघातील कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून या प्रकल्पाला अखेरपर्यंत विरोध कायम ठेवण्याचा इशाराही दिला आहे. मात्र अमेरिकेतील सत्ताबदलानंतर रशिया व जर्मनी या दोन्ही देशांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलली होती. अमेरिका व जर्मनीत झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्यास मान्यता दिली होती.रशियाकडून ‘नॉर्ड स्ट्रीम२’मध्ये इंधनवायू भरण्याची प्रक्रिया सुरू

या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात प्रकल्प पूर्ण होणे व इंधनवाहिनीत इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणे या घटना लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलासह नैसर्गिक इंधनवायूच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचवेळी त्याचा पुरवठा मागणीच्या तुलनेत मर्यादित असल्याचे संकेतही देण्यात येत आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यात युरोपिय देशांना इंधनाच्या टंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी चिंता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत रशियाने इंधनवाहिनी सक्रिय करण्यासाठी केलेल्या हालचाली, युरोपसाठी धोक्याची चिन्हे ठरतात असे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

मात्र इंधनवायू भरण्याची प्रक्रिया तांत्रिक चाचणीसाठी असून त्यातून युरोपला इंधनपुरवठा सुरू होणार नसल्याचा दावा रशियन सूत्रांकडून करण्यात आला आहे.

leave a reply