युक्रेनचा शेजारी देश असणाऱ्या मोल्दोव्हात युरोपिय महासंघाच्या समर्थनार्थ मोर्चा

मोल्दोव्हा – युक्रेनचा शेजारी देश असणाऱ्या मोल्दोव्हात रविवारी युरोपिय महासंघाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. मोल्दोव्हाच्या राष्ट्राध्यक्ष माया सॅन्डू यांनीच या मोर्च्याचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. सॅन्डू यांची राजवट युरोप समर्थक असून रशिया मोल्दोव्हामध्ये अराजक निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर रशियाने युरोपिय महासंघ व पाश्चिमात्य देशांकडून मोल्दोव्हात रशियाविरोधी गटांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा ठपका ठेवला आहे.

युक्रेनच्या शेजारी असणारा मोल्दोव्हात रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून अस्थैर्याचे वातावरण आहे. या देशाच्या सरकारकडून सातत्याने रशियावर आरोप केले जात आहेत. रशिया मोल्दोव्हातील राजवट बदलण्याचा कट आखत असल्याचे दावे करण्यात येत असून त्याला पाश्चिमात्य माध्यमांमधून प्रसिद्धीही देण्यात आली आहे.

एकेकाळी रशियन संघराज्याचा (सोव्हिएत रशिया) भाग असणाऱ्या मोल्दोव्हाची लोकसंख्या २६ लाख असून त्यात रशियन भाषिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या वर्षी मोल्दोव्हाच्या सरकारने युरोपिय महासंघाचा सदस्य बनण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

leave a reply