झॅपोरिझिआतील अणुप्रकल्प धोकादायक स्थितीत

- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचा इशारा

जीनिव्हा/मॉस्को – युरोपमधील सर्वात मोठा अणुप्रकल्प असलेला युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्प मोठ्या आपत्तीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिला. प्रकल्पाच्या जवळच्या क्षेत्रात रशिया व युक्रेन या दोन्ही देशांच्या लष्कराकडून तोफा, रॉकेटस्‌‍ व मॉर्टर्सचा मारा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या संभाव्य प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने प्रकल्पाच्या जवळ असणाऱ्या नागरी वस्त्यांमधून स्थलांतरणाची मोहीम हाती घेतली होती.

दोन दिवसांपूर्वी अणुप्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र त्यालाही मर्यादा असल्याने अणुप्रकल्प धोक्यात आल्याचे संकेत मिळाले होते. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर सातव्यांदा अशा प्रकारची घटना घडत असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. हे सतत घडत राहिल्यास चेर्नोबिलप्रमाणे भयावह दुर्घटना घडण्याची भीती वारंवार व्यक्त करण्यात आली आहे, याकडेही आयोगाने लक्ष वेधले. प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी आयोगाने आपले निरीक्षक प्रकल्पात तैनात केले असून प्रकल्पाचा पूर्ण परिसर रशियन लष्कराच्या ताब्यात आहे.

leave a reply