युरोप अमेरिकेचे प्यादे बनले आहे

- तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचा आरोप

इस्तंबूल/वॉशिंग्टन – ‘युरोपच्या नेतृत्त्वाकडे धोरणात्मक स्वायत्तता राहिलेली नाही. त्यांचे धोरण अमेरिकेपेक्षा वेगळे नाही, त्यामुळे युरोपिय नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. युरोपच्या लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढते आहे आणि त्यांची अर्थव्यवस्थाही पूर्वीसारखी राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युरोपचे महत्त्व घटले आहे. किंबहुना युरोप नावाचा स्वतंत्र घटकच अस्तित्त्वात राहिलेला नाही. युरोप म्हणजे अमेरिकेतील केवळ एक ट्रेंड आहे’, अशा शब्दात तुर्कीचे अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलू यांनी युरोपवर घणाघाती टीकास्त्र सोडले.

युरोप अमेरिकेचे प्यादे बनले आहे - तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचा आरोपकाही दिवसांपूर्वी इस्तंबूलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तुर्कीच्या मंत्र्यांनी पाश्चिमात्य देशांविरोधात जोरदार आगपाखड केली.पाश्चिमात्य देशांमध्येही अमेरिकाच वर्चस्व राखून असून युरोप त्यांच्या हातातील प्यादे असल्याचा ठपका तुर्कीच्या मंत्र्यांनी ठेवला. ‘अमेरिका केवळ त्यांचे हितसंबंध जपण्याला प्राधान्य देत आहे. युरोपच्या नेत्यांकडून राबविण्यात येणारी धोरणे व त्यांची कृती हा अमेरिकेचे हितसंबंध राखण्याचाच भाग आहे’, असा दावा तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी केला.

त्याचवेळी संपूर्ण जग अमेरिकेचा द्वेष करीत असल्याचा दावा करून त्यांनी पाश्चिमात्यांकडून लादण्यात येणाऱ्या गोष्टींविरोधात जोरदार कोरडे ओढले. ‘पाश्चिमात्य देश आपल्यावर त्यांची संस्कृती व सवयी लादण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना संपूर्ण जगात एकसमान असणारी माणसे हवी आहेत. आपल्याविरोधात सांस्कृतिक दहशतवादाचा वापर होत असून कुटुंबव्यवस्था, नैतिकता, इतिहास, संस्कृती, मूल्ये, परंपरा आणि आपल्या पूर्वजांची शिकवण नष्ट करण्याच्या कारवाया सुरू आहेत’, असा आरोप सोयलू यांनी केला.

युरोप अमेरिकेचे प्यादे बनले आहे - तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचा आरोपपाश्चिमात्य देशांच्या लोकशाही व्यवस्थेवरही तुर्कीच्या मंत्र्यांनी कोरडे ओढले. गेल्या काही वर्षात पाश्चिमात्य देशांमध्ये लोकशाहीचे धिंडवडे निघाल्याचा दावा करीत अमेरिका व युरोपातील लोकशाहीचे रंग उडाल्याचे दिसत आहेत, असे वक्तव्य सोयलू यांनी केले. येत्या काळात पाश्चिमात्य देशांचा प्रभाव ओसरणार असून तुर्कीचे नेतृत्त्व त्याच दिशेने प्रयत्न करीत असल्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन तुर्कीला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देतील, असे सोयलू म्हणाले.

तुर्कीत पुढील महिन्यात निवडणूक होत असून एर्दोगन यांच्या एकाधिकारशाहीला धक्के बसतील, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कीतील एर्दोगन समर्थक नेत्यांनी पाश्चिमात्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सोयलू यांची वक्तव्येही त्याचाच भाग दिसत आहेत.

सुरक्षामंत्री असलेल्या सोयलू यांनी काही दिवसांपूर्वी तुर्कीतील अमेरिकी राजदूतांवरही टीका केली होती. 2016 साली एर्दोगन यांच्या राजवटीविरोधात झालेल्या बंडामागे अमेरिकेचाच हात असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला होता.

leave a reply