इस्रायलला इराणपासून धोका आहे हे युरोपने मान्य करायला हवे – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड

ब्रुसेल्स – ‘गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायल आणि युरोपिय देशांमधील संबंध पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. मला तुमचे विचार मोकळेपणाने ऐकायचे आहे. त्याचवेळी इस्रायलला इराणपासून धोका आहे, इस्रायलवर हल्ले चढविणार्‍या हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांना इराणचे समर्थन आहे, हे देखील युरोपिय देशांनी मान्य केलेच पाहिजे’, असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी युरोपिय महासंघाच्या बैठकीत बजावले. त्याचबरोबर इस्रायलमधील नव्या सरकारबरोबर संबंध सुधारण्यासाठी युरोपिय महासंघ नवी सुरुवात करू शकेल, असा प्रस्ताव लॅपिड यांनी दिला.

येर लॅपिडइस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच ब्रुसेल्स येथील युरोपिय देशांच्या मुख्यालयला भेट दिली. गेल्या काही वर्षांपासून इस्रायल आणि महासंघात मतभेद निर्माण झाले होते. महासंघाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी हा दौरा केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. यावेळी युरोपिय महासंघातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणचा धोका अधोरेखित केला.

इराण हा जागतिक दहशतवादाचा अव्वल क्रमांकाचा निर्यातदार आहे. अशा या इराणने कधीही अण्वस्त्रनिर्मितीची आणि त्याच्या सहाय्याने इस्रायलला लक्ष्य करण्याची इच्छा कधीही लपवून ठेवलेली नाही. त्याचबरोबर इस्रायलवर हल्ले चढविणार्‍या लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि गाझातील हमासलाही इराणने पाठिंबा दिला. त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षेला इराणपासून असलेला धोका युरोपने मान्य केलाच पाहिजे’, असे लॅपिड यांनी स्पष्ट केले.

येर लॅपिडमहासंघासमोर बोलताना इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युएई, बाहरिन, मोरोक्को, सुदानबरोबर झालेल्या अब्राहम कराराचा उल्लेख केला. इस्रायल आणि अरब देशामध्ये संबंध प्रस्थापित होत असून यात अधिक देशांना सहभागी करण्यासाठी इस्रायल उत्सूक असल्याचे लॅपिड यांनी सांगितले. त्याचबरोबर द्विराष्ट्रवादावर पॅलेस्टाईनशी देखील चर्चा होऊ शकते, असे परराष्ट्रमंत्री लॅपिड म्हणाले. ‘पण इस्रायलला शांतीचा पुरस्कार करणारे लोकशाहीवादी पॅलेस्टाईन अपेक्षित आहे. इस्रायलींच्या सुरक्षेला धोका ठरणारा शेजारी इस्रायल प्रस्थापित होऊ देणार नाही’, असे लॅपिड यांनी बजावले.

दरम्यान, 2012 सालानंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपिय महासंघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. या भेटीत फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि झेक प्रजासत्ताकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लॅपिड यांची भेट घेतली. तसेच इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांच्याबरोबरही चर्चा केली.

leave a reply