पाकिस्तानातील बॉम्बस्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार

- चीनने कठोर कारवाईची मागणी केली

पेशावर/बीजिंग – पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वामधील अप्पर कोहिस्तानमध्ये एका बसमध्ये झालेल्या स्फोटात 13 जण ठार झाले. यामध्ये नऊ चिनी इंजिनिअर्सचा समावेश होता. ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर-सीपीईसी’ प्रकल्पाचा भाग असलेल्या ‘दासू डॅम’ प्रकल्पावर हे चिनी इंजिनिअर्स काम करीत होते. हा दहशतवादी हल्ला होता, असा दावा पाकिस्तानच्या संसदिय कामकाजमंत्री बाबर अवान यांनी केला. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दुर्घटना असल्याचे जाहीर करून टाकले. पण चीनने मात्र या घातपाताच्या मागे असलेल्यांना पाकिस्तानने कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानातील बॉम्बस्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार - चीनने कठोर कारवाईची मागणी केलीसदर बस एका दरीत कोसळली व त्यानंतर स्फोट झाला, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. त्यामुळे यामागे घातपात असण्याची शक्यता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निकालात काढण्याचा आपल्या परीने प्रयत्न करून पाहिला. पण त्याच्या आधीच पाकिस्तानचे संसदिय कामकाज मंत्री बाबर अवान यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले. हा भ्याड हल्ला होता, असे सांगून अवान यांनी त्याचा निषेध केला. या हल्ल्यानंतरही पाकिस्तान व चीनमधील सहकार्य बाधित होणार नाही, असे अवान पुढे म्हणाले. मात्र हा नक्की घातपात होता की अपघात याबाबतची स्पष्ट भूमिका पाकिस्तानने घेतलेली नाही. पण चीन मात्र याकडे घातपात म्हणूनच पाहत असल्याचे दिसते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सदर बसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे मान्य करून याचा कडक शब्दात निषेध केला. हा घातपात घडवून आणणार्‍यांना पाकिस्ताने कठोर शासन करावे आणि चिनी नागरिक, संस्था व प्रकल्प यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने अधिक प्रयत्न करावे, अशी मागणी लिजिआन यांनी केली. तर पाकिस्तानातील चिनी दूतावासाने देखील चीनचे पाकिस्तानातील प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून चिनी नागरिकांना आवश्यकता असल्याखेरीज बाहरे पडू नका, अशी सूचना दिली आहे. मात्र या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानातील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पाकिस्तानातील बॉम्बस्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार - चीनने कठोर कारवाईची मागणी केलीचीन व पाकिस्तानमधील सीपीईसी प्रकल्प सध्या कार्यान्वित नाही. कारण दोन्ही देशांमध्ये या प्रकल्पावरून तीव्र मतभेद असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानची जनता चीनच्या या प्रकल्पापासून आपल्या देशाला नक्की किती लाभ मिळत आहे, याची माहिती सार्वजनिक करा, अशी मागणी करत आहे. चीनने या प्रकल्पाद्वारे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केली की पाकिस्तानला कर्ज दिले, तेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत चीन पाकिस्तानकडे या प्रकल्पासाठी दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत चिनी इंजिनिअर्सवर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानातील स्थानिक असंतुष्ट असण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबतचे तपशील समोर आलेले नाहीत.

एप्रिल महिन्यात बलोचिस्तानमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाद्वारे पाकिस्तानातील चीनच्या राजदूतांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता. याची जबाबदारी पाकिस्तानातील ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

leave a reply