युरोप व तुर्कीमधील शस्त्रविक्रीवर बंदीसाठी ग्रीसची आक्रमक भूमिका

शस्त्रविक्रीवर बंदीब्रुसेल्स – ग्रीस व तुर्कीमधील वाद अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. युरोपिय सदस्य देशांनी तुर्कीला शस्त्रास्त्रांची विक्री करू नये यासाठी ग्रीसने आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. तुर्कीला शस्त्रविक्री केल्यास त्याचा वापर युरोपिय देशाविरोधातच होऊ शकतो, अशी आग्रही भूमिका ग्रीक नेत्यांनी मांडली आहे. जर्मनीकडून तुर्कीला पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी सहाय्य करण्यात येत असून त्याला ग्रीसने जोरदार विरोध दर्शविला आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला तुर्कीला शह देण्यासाठी ग्रीसने सौदी अरेबियाबरोबरील संरक्षणसहकार्य वाढविण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनसाठ्यांच्या मुद्यावरून ग्रीस व तुर्कीमध्ये सध्या जबरदस्त तणाव आहे. तुर्कीने ग्रीसनजिकच्या सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन तसेच संशोधनासाठी जहाजे पाठवून ग्रीसला चिथावणी दिली आहे. त्याविरोधात ग्रीसनेही आक्रमक भूमिका घेतली असून आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. युरोपिय महासंघाने या मुद्यावर ग्रीसला समर्थन दिले असले तरी महासंघातील काही देश तुर्कीच्या पूर्ण विरोधात जायला तयार नाहीत. जर्मनी, स्पेन, नेदरलॅण्डस् यासारख्या देशांनी घेतलेली भूमिका याला दुजोरा देणारी ठरली आहे.

शस्त्रविक्रीवर बंदीतुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी त्यावर निर्बंध घालावेत, असा प्रस्ताव ग्रीसकडून देण्यात आला होता. मात्र जर्मनीने या प्रस्तावाला विरोध करून तो उधळून लावला. यामागे तुर्कीबरोबरील संरक्षण तसेच व्यापारी सहकार्य कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता ग्रीसने तुर्की व युरोपिय देशांमधील संरक्षण सहकार्य रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ग्रीक नेत्यांनी जर्मन सरकारशी बोलणी सुरू केल्याचेही समोर येत आहे.

चर्चेदरम्यान ग्रीसने युरोपिय देशांनी २०१४ सालच्या रशिया-युक्रेन संघर्षानंतर घेतलेल्या निर्णयांचा दाखला दिला आहे. रशियाने चढविलेल्या हल्ल्यानंतर फ्रान्स तसेच जर्मनीने रशियाबरोबरील मोठे संरक्षण करार रद्द केले होते. तुर्कीबाबत अशीच भूमिका घेण्या यावी, असा आग्रह ग्रीसकडूनन धरण्यात आला आहे.

याच पार्श्‍वभूमीवर, तुर्कीला शह देण्यासाठी ग्रीसने इतर देशांबरोबरील संरक्षणसहकार्य मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्रीसने सौदी अरेबियाला ‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’ पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

leave a reply