कठोर पावले उचलल्यास कोरोनाची तिसरी लाट टाळता येईल

- पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन

कोरोनाची तिसरी लाटनवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट अद्याप अटोक्यात आली नसताना तिसरी लाट येईल, असे इशारे तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. ही तिसरी लाट किती मोठी असेल? ही लाट कधी येईल? या लाटेत किती जणांना लागण होईल? असे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. मात्र या लाटेसाठी तयार रहायला हवे, असे तज्ज्ञ बजावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट टाळता येणे आपल्या हातात आहे, असे स्पष्ट केले आहे. कडक उपाययोजना आणि त्याच्या कठोर अंमलबजावणीवर बरेच काही अवलंबून असेल असे राघवन यांनी म्हटले होते.

देशात सध्या दिवसाला चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहेत, तसेच सुमारे चार हजार रुग्णांना या साथीमुळे दरदिवशी आपले प्राण गमवावे लागत आहेत. शुक्रवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या ४.१४ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर ३ हजार ९१५ रुग्ण दगावले. यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या २.३४ लाखांवर पोहोचली आहे. तसेच २.१४ कोटी रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.

कोरोनाची तिसरी लाटमार्चच्या सुरुवातीला देशात काही राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. १ मार्च रोजी एका दिवसात सुमारे १२ हजार रुग्ण आढळले होते. तेच महिन्याभरानंतर दिवसाला ९५ ते एक लाख रुग्णांची नोंद होऊ लागली. तर सध्या दिवसाला जवळजवळ सव्वा चार लाख रुग्णांची नोंद होत आहे. हेच गेल्यावर्षीच्या पहिल्या लाटेत चोवीस तासात आढळणार्‍या रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यात सुमारे ९८ हजारांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर ठरत आहे. अशावेळी कोरोनाची तिसरी लाटही येईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

गुरुवारीही पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार के.व्ही. राघवन यांनीही याबाबत इशारा देताना ही लाट अटळ असल्याचे सांगितले होते. मात्र ती कधी येईल? किती काळ राहील हे आता सांगता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयार राहा, असेही बजावले होते.

शुक्रवारी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना कोरोनाच्या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र ती टाळता येईल. त्याचा प्रभाव कमी करता येईल. या गोष्टी कठोर उपाययोजनांवर अवलंबून आहेत. कोरोनाबाबत जारी केलेल्या गाईडलाईन्सचे काटेकोर पालन झाले, स्थानिक पातळीवर नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली, तर ही लाट सगळीकडे येणार नाही. काही ठरावीक भागातच या लाटेचा प्रभाव नियंत्रित राहील, असे राघवन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रात ८९८ जणांचा बळी गेला. तसेच ५४ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात ४८,७८१ नवे रुग्ण आढळले, तसेच ५९२ जणांचा मृत्यू झाला. केरळात कोरोनाचे ३८ हजार ४६० नवे रुग्ण सापडले असून ५४ जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेशात चोवीस तासात ३७२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून २८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत १९ हजार नवे रुग्ण आढळले, तर ३४१ जण या साथीमुळे दगावले.

leave a reply