युरोपिय देशांनी तैवानच्या आखातातील सागरी गस्त वाढवावी

- युरोपिय महासंघाच्या अध्यक्षांचे आवाहन

ब्रुसेल्स/बीजिंग/तैपेई – अतिशय महत्त्वाच्या सागरी क्षेत्रातील वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी युरोपिय देशांनी पुढाकार घ्यावा. युरोपिय देशांनी तैवानच्या आखातातील आपल्या विनाशिकांची गस्त वाढवावी, असे आवाहन युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी केले. यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. चीनने १३ लढाऊ विमाने आणि तीन विनाशिका तैवानच्या आखातात गस्तीसाठी रवाना करुन युरोपला इशारा दिला. तसेच युरोपिय विनाशिकांनी तैवानच्या आखातात आपले सामर्थ्य प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलाच, तर अपयशाखेरीज दुसरे काहीही त्याच्या वाट्याला येणार नाही, असे चीनच्या सरकारी मुखपत्राने बजावले आहे.

युरोपिय देशांनी तैवानच्या आखातातील सागरी गस्त वाढवावी - युरोपिय महासंघाच्या अध्यक्षांचे आवाहनफ्रान्समधील वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात युरोपिय महासंघाचे प्रमुख बोरेल यांनी चीनबरोबरच्या संबंधांचा उल्लेख केला. युरोपिय देशांनी चीनबरोबर पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्यावर सहकार्य ठेवणे आवश्यक असल्याचे बोरेल म्हणाले. युरोपिय महासंघ तसेच चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी हे सहकार्य महत्त्वाचे असेल, असा दावा बोरेल यांनी केला. पण सुरक्षेच्या मुद्यावर चीनने घेतलेल्या भूमिकांविरोधात युरोपिय देशांनी एकजूट करावी, असे आवाहन बोरेल यांनी केले.

युक्रेनच्या युद्धात रशियाला लष्करी सहाय्य पुरविण्याचा चीनचा निर्णय आणि तैवानची यथास्थिती बदलण्यासाठी सुरू असलेल्या चीनच्या लष्करी हालचालींविरोधात युरोपिय देशांनी ठाम भूमिका घ्यावी, असे बोरेल म्हणाले. यापैकी तैवानच्या मुद्यावर बोलताना महासंघाच्या प्रमुखांनी सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला. युरोपिय देशांनी तैवानच्या आखातातील सागरी गस्त वाढवावी - युरोपिय महासंघाच्या अध्यक्षांचे आवाहनया सागरी स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी युरोपिय देशांनी तैवानच्या आखातातील आपल्या विनाशिकांची गस्त वाढवावी, असे आवाहन बोरेल यांनी केले. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी चीनचा दौरा केला होता. तैवानच्या मुद्यावरुन अमेरिका किंवा चीनमध्ये युद्ध भडकल्यास युरोपिय महासंघाने त्यापासून दूर रहावे, असा सल्ला मॅक्रॉन यांनी दिला होता. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तैवानप्रश्नी चीनविरोधात न जाण्याची भूमिका स्वीकारली असली तरी युरोपमधील इतर देश या भूमिकेशी सहमत नसल्याचे संकेत युरोपिय महासंघाच्या प्रमुखांनी आपल्या लेखाद्वारे दिले आहेत.

बोरेल यांच्या या भूमिकेवर चीनमधून जहाल प्रतिक्रिया आली. तैवानबाबत युरोपिय देशांनी पॅसिफिक क्षेत्रात शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केलाच तर त्यांना मानहानीकारक अपयशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘पिपल्स डेली’ने दिला आहे.

leave a reply