रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिका अस्वस्थ

वॉशिंग्टन/पॅरिस – गेल्या काही दिवसात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. रशियावर प्रभाव असणाऱ्या चीनच्या सहाय्याने ही शांतीचर्चा घडविण्यासाठी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. मात्र अमेरिकेला विश्वासात न घेता फ्रान्सने सुरू केलेल्या या प्रयत्नांमुळे अमेरिकी वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा आघाडीच्या दैनिकाकडून करण्यात आला.

रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिका अस्वस्थएप्रिल महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनचा दौरा केला होता. हा दौरा रशिया-युक्रेन शांतीचर्चेच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात व्हावी यासाठी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रशियावर प्रभाव टाकता येणाऱ्या देशांमध्ये चीनचा समावेश असून या देशाच्या सहकार्याने शांतीचर्चेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, असा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा इरादा आहे. चीनच्या सहाय्याने फ्रान्सने सुरू केलेल्या हालचालींवर रशियानेही सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आपल्या सल्लागारांना चिनी अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात राहून रशिया-युक्रेन शांतीप्रक्रियेसंदर्भात बोलणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिका अस्वस्थयासंदर्भात निर्णय घेताना मॅक्रॉन यांनी अमेरिका अथवा युरोपातील इतर आघाडीच्या देशांशी सल्लामसलत केलेली नाही. त्यामुळे अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी व पोलंड हे देशही अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येते.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली होती. पुतिन यांच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा केल्याची माहितीही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिली होती. मात्र त्यावेळी मॅक्रॉन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नव्हते. पण रशियाबरोबर संवाद कायम ठेवणे आवश्यकआहे, अशी भूमिका मॅक्रॉन यांनी मांडली होती. आताही मॅक्रॉन या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत असून चीनबरोबर सुरू असलेले प्रयत्न त्याला दुजोरा देणारे ठरतात.

leave a reply