रशियन इंधनकपातीनंतर युरोपिय महासंघात ‘गॅस रेशनिंग’वर एकमत

gas-rationingमॉस्को/ब्रुसेल्स – रशियाची आघाडीची इंधनकंपनी गाझप्रोमने युरोपिय देशांचा इंधनपुरवठा पुन्हा एकदा घटविण्याचा इशारा दिला आहे. रशियाच्या या इशाऱ्यानंतर युरोपिय महासंघाच्या बैठकीत इंधनाचे रेशनिंग करण्यावर एकमत झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून युरोपिय देश त्यांचा इंधनाचा वापर 15 टक्क्यांनी घटविणार आहेत. याचा मोठा फटका युरोपिय उद्योगक्षेत्राला बसू शकतो, असा इशारा विश्लेषक तसेच उद्योजकांनी यापूर्वीच दिला आहे.

गेल्या महिन्यात तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून रशियाने युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीचा इंधनपुरवठा घटविला होता. त्यानंतर ऑस्ट्रिया, इटली यासारख्या देशांच्या इंधनपुरवठ्यातही घट करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी रशियाने युरोपिय देशांना इंधनवायुचा पुरवठा करणारी ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ ही इंधनवाहिनी बंद करण्याची घोषणा केली. दुरुस्ती व देखभालीसाठी ही इंधनवाहिनी 10 दिवसांसाठी इंधनपुरवठा करणार नाही, असे रशियाकडून सांगण्यात आले हेोते. गेल्या आठवड्याच्या अखेरीस इंधनवाहिनी सुरू करण्यात आली होती.

मात्र आता पुन्हा तांत्रिक कारण पुढे करून बुधवारपासून ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ इंधनवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करण्यात येईल, असे गाझप्रोम या कंपनीने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघाची बैठक पार पडली असून त्यात ‘गॅस रेशनिंग’चा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला हंगेरी व ग्रीस या दोन देशांनी विरोध केल्याचे सांगण्यात येेते. रेशनिंगच्या निर्णयानुसार, ऑगस्ट 2022 ते मार्च 2023 या कालावधीत युरोपिय देश आपला इंधनवायूचा वापर 15 टक्क्यांनी कमी करणार आहेत.

दशकभरापूर्वी कार्यान्वित झालेली ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ इंधनवाहिनी ही ‘सब-सी’ प्रकारातातील जगातील सर्वाधिक लांबीची इंधनवाहिनी आहे. तब्बल 1,200 किलोमीटर्सहून अधिक लांबीच्या या इंधनवाहिनीतून युरोपिय देशांना दरवर्षी 1.9 ट्रिलियन घनफूट इतक्या प्रचंड प्रमाणात इंधनवायू पुरविण्यात येतो. रशियाच्या वायबोर्गपासून ते जर्मनीच्या लुबमिन शहरापर्यंत असलेल्या या इंधनवाहिनीत रशियाव्यतिरिक्त जर्मन, फ्रेंच व डच कंपन्यांची भागीदारी आहे.

रशियाच्या गाझप्रोम कंपनीने इंधनपुरवठा कमी करण्याबाबत घेतलेला निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप ‘ईयु एनर्जी चिफ’ कॅड्रि सिमसन यांनी केला.

leave a reply