सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद युरोपिय देशांच्या दौऱ्यावर दाखल

युरोपिय देशांच्या दौऱ्यावरअथेन्स – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान युरोपिय देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांची भेट घेतली. यानंतर प्रिन्स मोहम्मद फ्रान्सचा दौरा करतील. 2018 सालच्या पत्रकार खशोगी हत्याप्रकरणानंतर पहिल्यांदाच सौदीचे क्राऊन प्रिन्स युरोपच्या दौऱ्यावर असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे युरोपिय देशांना इंधनटंचाईला सामोरे जावे लागत असताना इंधनसंपन्न सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा हा युरोप दौरा लक्षवेधी ठरतो.

प्रिन्स मोहम्मद मंगळवारी सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा समावेश असलेले मोठे शिष्टमंडळ घेऊन ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये दाखल झाले. यानंतर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि ग्रीसच्या पंतप्रधानांमध्ये विशेष बैठक पार पडली. यामध्ये उभय देशांमध्ये ऊर्जा, व्यापारी गुंतवणूक, सागरी व्यापार तसेच संरक्षणविषयक सहकार्य करार पार पडले. यापैकी ऊर्जाविषयक सहकार्यामुळे ग्रीसला अतिशय स्वस्त दरात इंधनाचा पुरवठा करता येईल, असे संकेत प्रिन्स मोहम्मद यांनी युरोप दौऱ्याआधीच दिले होते.

2018 साली तुर्कीमध्ये सौदीचे पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या करण्यात आली होती. तुर्कीने खशोगी हत्येसाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांना जबाबदार धरले होते. प्रिन्स मोहम्मद यांच्या आदेशानेच पत्रकार खशोगी यांची हत्या झाल्याचा ठपका तुर्कीने ठेवला होता. यानंतर अमेरिकेसह युरोपिय देशांनी सौदीबरोबरच्या सहकार्यातून माघार घेतली होती. सौदीने मानवाधिकार नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप युरोपिय देशांनी केला होता.

खशोगी हत्याप्रकरणी अमेरिका व युरोपिय देशांनी सौदीवर टीका केल्यानंतर क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी पाश्चिमात्य देशांचा दौरा टाळला होता, याची आठवण युरोपिय विश्लेषकांनी करुन दिली. पण ग्रीससारख्या काही युरोपिय देशांनी सौदीबरोबर सहकार्य सुरू ठेवण्याचे धोरण स्वीकारले होते.

2020 साली ग्रीसच्या पंतप्रधानांनी सौदीचा दौरा करून प्रिन्स मोहम्मद यांची भेट घेतली होती. द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबर सौदीची गुंतवणूक मिळविण्यासाठी ग्रीसच्या पंतप्रधानांनी प्रयत्न केले होते. अशा परिस्थितीत, सौदीच्या प्रिन्स मोहम्मद यांचा ग्रीसचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो. यानंतर सौदीचे क्राऊन प्रिन्स फ्रान्सला रवाना होतील व राष्ट्राध्यक्षइमॅन्युअल मॅक्रॉन यांचीभेट घेणार आहेत.

गेल्या दहा दिवसात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि अरब देशाच्या नेतृत्वामधील ही दुसरी भेट ठरते. गेल्या आठवड्यात युएईचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांनी फ्रान्सचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याबरोबर इंधनविषयक सहकार्यावर चर्चा केली होती. यावेळी दोन्ही देशांमध्ये इंधनविषयक सहकार्य करारही संपन्न झाले होते.

दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपिय देशांसमोर इंधनटंचाईचे संकट अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. रशिया इंधनाचा पुरवठा कमी करीत असताना, युरोपिय देश इंधनसंपन्न आखाती देशांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सौदी व युएईचा दौरा केला होता.

रशियाच्या इंधनावरील युरोपिय देशांचे अवलंबित्त्व ही फार मोठी समस्या बनली आहे. रशिया युरोपच्या विरोधात इंधनाचा हत्यारासारखा वापर करीत असल्याचे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत, युरोपिय देश रशियन इंधनाला पर्याय शोधत असून त्यासाठी आखाती देशांशी सहकार्य प्रस्थापित करीत आहेत. रशियाला धक्का देण्यासाठी अमेरिका देखील युरोप व आखाती देशांमधील या सहकार्याला प्रोत्साहन देत आहे. यासाठीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकताच आखाती देशांचा दौरा केला होता.

युरोपिय देशांना सौदी तसेच इतर आखाती देशांनी इंधन पुरवावे, या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागल्याचे संकेत प्रिन्स मोहम्मद यांच्या युरोप भेटीतून मिळत आहेत. त्याचवेळी रशियाने देखील इराणबरोबरील इंधनविषयक सहकार्य वाढवून आखाती देशांच्या इंधनाचे पारंपरिक ग्राहक असलेल्या चीन व भारताला इंधनाची जोरदार विक्री सुरू केल्याचे दिसते आहे. यामुळे वरकरणी इंधनविषयक सहकार्य अशा बिरूदाखाली येणारे हे व्यवहार प्रत्यक्षात भू-राजकीय सत्तासंघर्षाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply