क्षेपणास्त्रापेक्षाही मोबाईलची मारक क्षमता वाढलेली असताना प्रत्येकाने गणवेश परिधान न केलेला सैनिक बनावे – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे आवाहन

चंदिगड – ‘आजच्या काळात क्षेपणास्त्रांपेक्षाही मोबाईलची मारक क्षमता अधिक प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे शत्रू सीमा पार न करताही आपल्यापर्यंत पोहचू शकतो. अशा काळात आपल्या सर्वांना गणवेश परिधान न केलेल्या सैनिकाची भूमिका पार पाडावीच लागेल’, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशासमोर खड्या ठाकलेल्या आव्हानांची जाणीव करून दिली.

मोबाईलची मारक क्षमता

चंदिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिलिटरी लिट्रीचर फेस्टीव्हल’ अर्थात ‘लष्करी साहित्याच्या महोत्सवाला’ संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते. मोबाईल तसेच सोशल मीडियाच्या प्रभावाचा शत्रूकडून केला जाणारा वापर हे देशासमोरील फार मोठे आव्हान बनले आहे, याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नेमक्या शब्दात देशवासियांना जाणीव करून दिली. बदलत्या काळात देशासमोरील धोकेही बदलत चालले आहेत. तसेच आत्ताच्या काळातील युद्धाचे स्वरुपही बदलले आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

‘याआधी आपण कल्पनाही केली नव्हती, अशा स्वरुपाचे धोके आपल्यासमोर खडे ठाकले आहेत. सायबर, जैविक युद्ध आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या आघाडीवरील युद्ध, यासारख्या अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. आजच्या काळात क्षेपणास्त्रांपेक्षाही मोबाईलची मारक क्षमता अधिक आहे. कारण यामुळे शत्रू सीमा पार न करता आपल्यापर्यंत येऊन धडकतो. अशा काळात चुकीच्या माहितीपासून व अपप्रचारापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे तसेच इतरांनाही त्यापासून वाचविणे आवश्यक बनले आहे. हे केवळ लष्कराचे काम नाही, त्यासाठी प्रत्येकाने गणवेश परिधान न केलेला सैनिक बनले पाहिजे’, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले.

थेटपणे उल्लेख केलेला नसला तरी चीन व पाकिस्तान या देशांनी भारतात अराजक माजविण्यासाठी सुरू केलेल्या प्रचारयुद्धाचा संदर्भ संरक्षणमंत्र्यांच्या संदेशातून मिळत आहे. लडाखच्या एलएसीवर चीनच्या जवानांना भारतीय सैनिकांनी रोखले आणि त्यानंतरच्या काळात चीनने भारत या आघाडीवर अपयशी ठरला व आपली सरशी झाली असा अपप्रचार सुरू केला होता. यानंतर चीनने मायक्रोव्हेव वेपन्सचा वापर करून भारतीय सैनिकांकडून पँगाँग त्सोच्या दक्षिणेकडील टेकड्यांचा ताबा घेतला, अशी खोडसाळ बातमीही चीनने सोडली होती. याबरोबरच लडाखच्या एलएसीवर चिनी लष्कराने फार मोठी मुसंडी मारून भारताचा कितीतरी किलोमीटर इतका भूभाग आपल्या ताब्यात घेतल्याचे दावे चीनने ठोकले होते. हा सारा चीनच्या प्रचारयुद्धाचा भाग होता. प्रत्यक्षात एलएसीवर चीनच्या लष्कराची अवस्था अतिशय बिकट बनली असून भारतीय सैन्याचे शौर्य व सिद्धता याने चीनचे लष्कर अचंबित झाले आहे. मात्र प्रचारयुद्धात आघाडी घेऊन चीन भारतावर मात केल्याचे चित्र उभे करू पाहत आहे.

चीनच्या या भारतविरोधी प्रचारयुद्धात पाकिस्तानची माध्यमे व विश्‍लेषक साथ देत असल्याचेही वारंवार स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, मोबाईल तसेच सोशल मीडियाचा प्रभाव वाढलेला असताना, प्रत्येकाने लष्करी गणवेश परिधान न केलेला सैनिक बनावे, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. आत्तापर्यंत देशाच्या सीमाभागाचा इतिहास व आत्तापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये ज्यांनी बलिदान केले त्यांच्या पराक्रमाच्या गाथा जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी आपण संरक्षणमंत्री बनल्यानंतर एका समितीची स्थापना केली होती, असे संरक्षणमंत्री म्हणाले. या आघाडीवर ‘मिलिटरी लिट्रीचर फेस्टीव्हल’ फार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

leave a reply