निर्यातबंदीनंतरही भारतातून बांगलादेशला २५ हजार टन कांद्याची निर्यात

नवी दिल्ली, दि.१९ (वृत्तसंस्था) – कांदा निर्यात बंदी असूनही भारताकडून बांगलादेशला २५,००० टन कांदा निर्यात केला जाणार आहे. कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर बांगलादेशातील कांद्याचे दर कडाडले होते. त्यावर बांगलादेशने या बंदीवर आपली नाराजी भारताकडे व्यक्त केली होती. भारताने आपल्या मित्रदेशाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निर्यातबंदीनंतरही भारतातून बांगलादेशला २५ हजार टन कांद्याची निर्यातशुक्रवारी रात्री उशीरा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड’ ने (डीजीएफटी) बांगलादेशला सुमारे २५,००० टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. भारताने तडकाफडकी बंदी घातल्यानंतर बांगलादेशच्या सीमारेषेवर प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे कांद्याचे २५० ट्रक अडकले आहेत. या बंदीमुळे बांगलादेशातील बाजारात कांद्याचे भाव कडाडले आहेत. बांगलादेशात प्रतिकिलो ३० ते ५० टका विकला जाणारा कांदा १२० टकापर्यंत पोहोचला असून कांद्याचा काळा बाजार होऊ लागला आहे.

अशा परिस्थितीत बांगलादेश सरकारने भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका स्थित भारतीय उच्चायुक्तालयाला पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली होती. आपला मित्रदेश नाराज झाल्याचे पाहून भारताने बांगलादेशला मदत करण्याच्या हेतूने २५ हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती डीजीएफटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

leave a reply