कोरोनानंतर चीनमध्ये ब्रुसेलॉसिसचे विषाणूचे हजारो रुग्ण

बीजिंग – कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे. वायव्य चीनमध्ये ब्रुसेलॉसिसचा संसर्ग झालेले तीन हजाराहून अधिक रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ब्रुसेला या विषाणूमुळे हा आजार होत असून वर्षभरापूर्वी एका औषधनिर्मिती कंपनीमधून झालेली गळती या संसर्गाच्या फैलावासाठी कारण ठरल्याचा दावा केला जातो. या विषाणूचा फैलाव मानवातून मानवात होत नसल्याचा दावा चीन करीत आहे. पण गेले वर्षभर चीनने कोरोनाव्हायरसच्या विषाणूबाबत केलेली लपवाछपवी पाहता ब्रुसेलॉसिसविषयी चीनकडून प्रसिद्ध होणार्‍या माहितीवर विश्वास ठेवणे अवघड जात आहे.

कोरोनानंतर चीनमध्ये ब्रुसेलॉसिसच्या विषाणूचे हजारो रुग्ण

चीनच्या गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरात वर्षभरापूर्वी एक दुर्घटना घडल्याचा दावा चिनी यंत्रणा करीत आहेत. २०१९ साली २४ जुलै ते २० ऑगस्टच्या काळात लॅन्झू शहरातील एका जैविक औषधनिर्मिती कारखान्यात प्राण्यांना होणार्‍या आजारावर ब्रुसेला विषाणूच्या सहाय्याने औषधनिर्मिती सुरू होती. सदर कारखान्यातून विषारी वायू आणि धूर कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडल्याने ब्रुसेलॉसिसचा फैलाव झाल्याचा दावा केला जातो. सुरुवातीला हवेतून पसरलेल्या या विषाणूमुळे २०० जणांनाच याची बाधा झाल्याचे बोलले जात होते. पण काही दिवसांपूर्वी लॅन्झू आरोग्य समितीने शहरातील २२ हजार जणांची चाचणी घेतल्यानंतर ३,२४५ जणांना ब्रुसेलॉसिसची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त अन्य एका चाचणीत १,४०१ जण देखील ब्रुसेलॉसिसबाधित असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.

कोरोनानंतर चीनमध्ये ब्रुसेलॉसिसच्या विषाणूचे हजारो रुग्णअमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार, ब्रुसेलॉसिस विषाणू हा माल्टा फिव्हर किंवा मेडिटेरियन फिव्हर म्हणून ओळखण्यात येतो. डोकेदुखी, वरचेवर ताप येणे, घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावूही शकतो, असा दावा ‘युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोल’ने केला. दीर्घकालीन उपचारानंतर हा आजार बरा होण्याची शक्यता वर्तविली जाते. गुरं, शेळी, डूक्कर यांचे अन्नातून सेवन केल्याने या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे बोलले जाते. तर संसर्ग झालेल्या प्राण्यांची कत्तल करणे किंवा त्यांना लस देणे. त्याचबरोबर दूधाचे पाश्चरायझेशन आणि दुग्धजन्य पदार्थांचे शुद्धीकरण या माध्यमातून या विषाणूचा संर्सग रोखता येतो, असा दावा युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोलने केला आहे.

दरम्यान, ब्रुसेलॉसिसच्या विषाणूचा मानवातून संसर्ग होत नसल्याचा दावा चीनने केला आहे. पण या विषाणूचा संसर्ग झालेल्या मानवातील या आजाराची लक्षणे फार काळ टिकून राहतात, अशी चिंता अमेरिकेच्या ‘सीडीसी’ने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कोरोनाव्हायरसप्रमाणे या विषाणूचा फैलाव चीनच्या ‘वेट मार्केट’मधून होत असल्याचे समोर आल्याने चिंता वाढल्याचे लॅन्झू आरोग्य समितीने म्हटले आहे.

leave a reply