बैरुतवर बाह्यशक्तिंनी क्षेपणास्त्र हल्ला चढविल्याची शक्यता – लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

बैरुत – अधिकार्‍यांची बेपर्वाई किंवा बाह्यशक्तिंनी चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे बैरुतच्या बंदरात स्फोट झाल्याचा दावा लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी केला. त्याचबरोबर बैरुतमधील स्फोटाची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची संयुक्त राष्ट्रसंघाची मागणीही एऑन यांनी धुडकावली. लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारलेल्या या भूमिकेकडे आश्चर्याने पाहिले जात आहे. दरम्यान, आपल्या देशाच्या दुरावस्थेसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत हजारो लेबेनीज निदर्शकांनी शनिवारी बैरुतमधील परराष्ट्र मंत्रालयाचा ताबा घेतला.

क्षेपणास्त्र हल्ला

बैरुतच्या बंदरात असुरक्षितरित्या साठवलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाल्याचे दावे लेबेनीज सुरक्षा यंत्रणांनी केले होते. याप्रकरणी संबंधित बंदराच्या कस्टम अधिकार्‍यांना अटकही करण्यात आली आहे. या स्फोटाच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांना या असुरक्षित साठ्याबाबत सावध केल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. तर एऑन यांनी देखील याबाबत माहिती मिळाल्याचे मान्यही केले आहे. तरीही दीडशेहून अधिक जणांचा बळी घेणार्‍या बैरुत स्फोटामागे दोन शक्यता असल्याचे राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी म्हटले आहे.

क्षेपणास्त्र हल्ला

’गेल्या सात वर्षांपासून अमोनियम नायट्रेटचा साठा या बंदरात पडून होता. त्यामुळे यासाठी मी जबाबदार ठरत नाही’, असे सांगून एऑन यांनी स्वत:वर होत असलेले आरोप फेटाळले. तर, ’या भीषण स्फोटासाठी अधिकार्‍यांची बेपर्वाई किंवा बाह्यशक्तिंचा क्षेपणास्त्र अथवा बॉम्ब हल्ला जबाबदार असण्याची शक्यता आहे’, असे एऑन म्हणाले. त्याचबरोबर या स्फोटावेळी लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्राने बैरुतच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता का, याची माहिती मिळविण्यासाठी फ्रान्सकडून सॅटेलाईट फोटो मागविल्याचे सांगून एऑन यांनी अमोनियम नायट्रेटबाबत सुरू असलेल्या चर्चेला वेगळे वळण दिल्याचे दिसत आहे.

क्षेपणास्त्र हल्ला

या स्फोटाची आंतरराष्ट्रीय निरिक्षकांकरवी चौकशी करण्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराची मागणीही एऑन यांनी धुडकावली. अशी भूमिका घेऊन राष्ट्राध्यक्ष एऑन हिजबुल्लाहचा बचाव करीत असल्याची टीका लेबेनॉनमध्ये जोर पकडू लागली आहे. २०१३ साली बैरुतच्या बंदरात उतरविलेल्या साठ्याचा ताबा हिजबुल्लाहकडे होता, असा आरोप केला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटन आणि जर्मनीत झालेल्या कारवाईमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटचा साठा सापडला होता. तर बैरुतमधील साठ्याचा वापर करुन हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत होता, असा आरोप इस्रायली माध्यमे करू लागली आहेत. काही महिन्यांपूर्वी हिजबुल्लाहने तशी धमकी दिल्याची आठवण इस्रायली माध्यमे करुन देत आहेत. मात्र हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाने बैरुतमधील अमोनियम नायट्रेटचा आपल्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बैरुतमध्ये राष्ट्राध्यक्ष एऑन आणि लेबेनॉनमधील इराणसमर्थक सरकार यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. शनिवारी निदर्शकांनी राष्ट्राध्यक्ष एऑन आणि हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाच्या विरोधात निदर्शने करीत सरकारी इमारतींवर ताबा घेण्याची घोषणा केली. काही निदर्शकांनी परराष्ट्र मंत्रालयाचा ताबा घेतल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. तर लेबेनॉनच्या विरोधी पक्षांनी देशात माफियांची सत्ता असल्याचा आरोप करुन संसदेतून राजीनाम देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लेबेनॉनमध्ये मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले असून राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी लष्कराला पकड मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत.

leave a reply