येमेनमधील दोन कोटींहून अधिक जणांवर उपासमारी व दुष्काळाचे संकट

- संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारा

सना – संघर्षग्रस्त येमेनमधील मानवतावादी संकट नियंत्रणाबाहेर गेले असून दोन कोटींहून अधिक जणांना उपासमारी व दुष्काळाच्या भीषण संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिला आहे. येमेनमध्ये २०१४ सालापासून अंतर्गत संघर्ष सुरू असून गेल्या काही महिन्यात त्याची तीव्रता पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. या संघर्षात हजारो जणांचा बळी गेला असून लाखो नागरिकांवर विस्थापित होण्याची पाळी ओढवली आहे.

येमेनमधील दोन कोटींहून अधिक जणांवर उपासमारी व दुष्काळाचे संकट - संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारासंयुक्त राष्ट्रसंघटनेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने येमेनमधील परिस्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. ‘येमेनमधील अन्नपुरवठा करणारी यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून अन्नधान्याच्या किमती भडकल्या आहेत. वाढत्या किमती व इंधनाची कमतरता यामुळे देशात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास दीड कोटींहून अधिक जण उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत आणि ५० लाखांहून अधिक जण दुष्काळाच्या खाईत लोटले जाऊ शकतात’, या शब्दात ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे संचालक डेव्हिड बिस्ले यांनी येमेनमधील परिस्थितीकडे लक्ष वेधले.

पुढील निधी उपलब्ध झाला नाही तर नाईलाजाने ३२ लाख जणांचे रेशन बंद करावे लागेल व डिसेंबरपर्यंत ही संख्या ५० लाखांपर्यंत जाऊ शकते, अशी भीतीही बिस्ले यांनी यावेळी व्यक्त केली. येमेनमधील जनतेकडे दैनंदिन अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी काहीही उरलेले नाही, असा दावाही ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या येमेनमधील प्रतिनिधींनी केला आहे. येमेनमधील दोन कोटींहून अधिक जणांवर उपासमारी व दुष्काळाचे संकट - संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारादिवसेंदिवस संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याने अन्नधान्याचा पुरवठा करण्यावरही मर्यादा आल्या असून त्यामुळे उपासमारीची समस्या अधिकच गंभीर होत असल्याचेही स्वयंसेवी गटांकडून सांगण्यात आले.

२०१४ सालापासून येमेनमध्ये सुरू झालेल्या संघर्षात २०१५ साली सौदी अरेबियानेही उडी घेतली होती. मात्र सहा वर्षानंतरही संघर्ष अद्याप थांबला नसून सरकार व इराणसमर्थक हौथी बंडखोरांमध्ये सातत्याने चकमकी उडत आहेत. गेल्या काही महिन्यात हौथी बंडखोरांनी अनेक महत्त्वाचे भाग ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. हौथी बंडखोरांनी स्वयंसेवी गटांवर तसेच मदतकार्यावर निर्बंध आणल्याचे आरोप पाश्‍चात्य माध्यमांकडून करण्यात आले आहेत.

leave a reply