रशियाचा आफ्रिकेतील वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली

russia africaमॉस्को/वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरच रशियाचा आफ्रिका खंडातील प्रभाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देश अस्वस्थ झाले असून त्यांनी रशियाचा प्रभाव रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. रशिया-चीन व अमेरिका-युरोप या दोन्ही बाजूंकडून आफ्रिकन देशांना आपल्याकडे वळविण्यासाठी धडपड सुरू आहे. यातून आफ्रिका खंडात नव्या शीतयुद्धाची सुरुवात होऊ शकते, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला.

रशियात सध्या आफ्रिका समीट सुरू असून जवळपास 40 आफ्रिकी देशांचे राष्ट्रप्रमुख व वरिष्ठ अधिकारी परिषदेला उपस्थित आहेत. ही बाब रशियाचा आफ्रिकेतील वाढता प्रभाव दाखवून देणारी ठरते. सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आफ्रिका हा नव्या बहुध्रुवीय जगातील नेतृत्त्वाचा महत्त्वाचा हिस्सा असेल, अशी ग्वाही दिली. रशिया आफ्रिकी देशांबरोबरील सहकार्याला नेहमीच प्राधान्य देईल, असा दावाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.

आफ्रिकी देशांना देण्यात आलेल्या कर्जांपैकी 20 अब्ज डॉलर्सची कर्जे रशियाकडून माफ करण्यात येत असल्याची घोषणाही पुतिन यांनी केली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ‘ग्रेन डील’बाबतही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आफ्रिकी देशांना आश्वस्त केले. पुढील काळात रशिया जरी या करारातून बाहेर पडला तरी आफ्रिकी देशांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. रशिया व आफ्रिकी देश बाहेरून लादण्यात येणाऱ्या नववसाहतवादी विचारसरणीला विरोध करीत असून सामाजिक तत्त्वे सुरक्षित राखण्यासाठी झटत असल्याचा दावाही पुतिन यांनी परिषदेत केला.

wheatt-russiaरशिया-युक्रेन संघर्षाला तोंड फुटल्यानंतर आफ्रिका खंडातील अनेक देशांनी अलिप्त धोरण स्वीकारून पाश्चिमात्यांच्या आघाडीला साथ देण्याचे नाकारले होते. यावरून अमेरिकेसह युरोपिय देशांनी दडपण आणण्याचे प्रयत्न केल्यानंतरही आफ्रिकी देशांनी आपली भूमिका कायम ठेवली होती. याच पार्श्वभूमीवर रशियाने आफ्रिकेतील आपला प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जानेवारी महिन्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आफ्रिका दौरा केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात रशियाची प्रगत युद्धनौका नौदल सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती.

इंधन व संरक्षणक्षेत्रातील सहकार्याच्या बळावर रशियाने आफ्रिकेतील सहकारी देशांच्या संख्येत भर टाकण्यास सुरुवात केली आहे. रशियातील कंत्राटी सुरक्षा कंपनी असणाऱ्या ‘वॅग्नर ग्रुप’ने आफ्रिकेतील काही देशांमध्ये आपली पथके तैनात केली असून त्या माध्यमातून रशिया आपला पाया अधिक विस्तारण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब अमेरिका व युरोपिय देशांना खटकत असून आता पाश्चिमात्य देशांनी उघडपणे याबाबत इशारे देण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी आफ्रिकेच्या नायजरला अचानक भेट दिली होती. या वर्षात वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने आफ्रिकेला भेट देण्याची ही चौथी वेळ ठरते. या भेटीत अमेरिकेने या देशासह साहेल क्षेत्रासाठी अर्थ व संरक्षणसहाय्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेने आफ्रिकेतील चाडच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या घडविण्यासाठी रशिया कट आखत असल्याचे दावे केले होते. त्यापूर्वी अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन व संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी आफ्रिकी देशांच्या रशियाबरोबरील वाढत्या जवळिकीबाबत इशारे दिले होते.

leave a reply