देशातील एफडीआय यावर्षी 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल

- वाणिज्य मंत्रालयाचा दावा

एफडीआयनवी दिल्ली – भारतात यावर्षीच थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) वेग कायम राहणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारत 84 अब्ज डॉलर्सचा एफडीआय खेचण्यात यशस्वी ठरला होता. देशातील एका वर्षातील ही सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक ठरली होती. चालू आर्थिक वर्षात देशात येणाऱ्या या एफडीआयचा हा विक्रमही मोडीत निघेल व ही गुंतवणूक 100 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा दावा वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केला आहे.

आर्थिक मंदीच्या दिशेने जगातील अनेक देश प्रवास करीत असताना भारतात मात्र मंदी येण्याची शक्यता नसल्याचे अहवाल येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावला आहे. आधी कोरोनाच्या महासाथीच्या लाटा, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, चीनमधील मंदावलेले उत्पादन क्षेत्र आणि आता युक्रेन युद्ध अशा संकटांच्या मालिकेचे परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवत आहेत. मात्र असे असले, तरी भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यामुळे यशस्वी ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असा दावा केला आहे. भारतात यावर्षी 100 अब्ज डॉलर्सचा एफडीआय येईल, असा विश्वास वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

देशातील 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध क्षेत्रात ही गुंतवणूक होईल. देशात 57 क्षेत्रांमध्ये 101 देशांमधून भारतात एफडीआय येतो, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. देशात एफडीआय मोठ्या प्रमाणावर येत आहे, याचे प्र्रमुख कारण गेल्या काही वर्षात उद्योग सुलभ वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. थेट परकिय गुंतवणुकीमध्ये येणारे अनेक अडथळे दूर करण्यात आले असून यासंबंधीच्या प्रक्रिया व नियम सुलभ करण्यात आल्या आहेत. करांमधील सुधारणा, नव्या उद्योगांना देण्यात येणाऱ्या सवलती, त्याच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजना यामुळे एफडीआय वाढत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply