जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेत मोठी उलथापालथ होण्याची भीती

वरिष्ठ अर्थतज्ज्ञ मोहम्मद अल-एरिअन यांचा इशारा

Mohamed El-Erian, Chief Economic Advisor of Allianz and Former Chairman of President Obama's Global Development Council, speaks during the Milken Institute Global Conference in Beverly Hills वॉशिंग्टन – ‘जग केवळ नव्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे, अशा भ्रमात राहू नका. जागतिक अर्थव्यवस्थेच्या संरचनेत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत’, असा इशारा अमेरिकेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ मोहम्मद अल-एरिअन यांनी दिला. सर्वसाधारणतः मंदीच्या काळात आर्थिक वाढीचे एक चक्र पूर्ण होऊन दुसरे चक्र सुरू होते; मात्र सध्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेत होणारे बदल आर्थिक वाढीच्या चक्रापेक्षा अधिक काळ परिणाम दाखविणारे असतील, असे एरिअन यांनी बजावले. काही महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी, जागतिक व्यवस्थेतील जुनी आर्थिक रचना मोडीत निघत असल्याची वक्तव्ये केली होती.

Global-economy‘फॉरेन अफेअर्स’ या वेबसाईटवर लिहिलेल्या एका लेखात अल-एरिअन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठ्या उलथापालथींचे संकेत दिले. ‘अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने तात्पुरती किंवा झटपट उलटी फिरवण्याजोगी असतात, असा समज रुढ झाला आहे. फेडरल रिझर्व्हने महागाईचा भडका व मंदीबाबत बांधलेले कयास त्याचे उदाहरण ठरते’, या शब्दात त्यांनी आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. मात्र सध्या जागतिक अर्थव्यवस्थेला फक्त मंदीचा धोका नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या रचनेतच बदल होत आहेत, याकडे एरिअन यांनी लक्ष वेधले.

जागतिक पातळीवर घडणाऱ्या काही घटना याचे संकेत देणाऱ्या असल्याचे अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी सांगितले. ‘पूर्वीच्या काळातील अपुऱ्या मागणीची जागा आता अपुऱ्या पुरवठ्याने घेतली आहे. दुसऱ्या बाजूला मध्यवर्ती बँकांनी अमर्यादित पैसा अर्थव्यवस्थेत ओतण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचवेळी वित्त व गुंतवणूक बाजारपेठेची स्थिती अतिशय नाजूक व कमकुवत बनली आहे. गेल्या काही वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या वेगळ्या व असाधारण घटनांमागे हे घटक कारणीभूत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे’, या शब्दात एरिअन यांनी अर्थव्यवस्थेतील बदलांकडे लक्ष वेधले.

Logistics,And,Transportation,Of,Container,Cargo,Ship,And,Cargo,Plane‘आर्थिक पातळीवर अधिक सातत्याने मोठे धक्के बसत आहेत. अनिश्चितता वाढते आहे. पण जगातील अनेक विश्लेषक या गोष्टी मान्य करण्यास तयार नाहीत’, असा दावा अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी केला. गेल्या दशकापर्यंत कार्यरत असलेल्या जागतिक पुरवठा साखळीच्या रचनेला धक्के बसले असून आघाडीच्या कंपन्या परदेशाऐवजी देशांतर्गत पातळीवर उत्पादन घेण्याचा पर्याय अवलंबित आहेत. यामुळे जागतिकीकरणाचे स्वरुप बदलले आहे, याची जाणीव एरिअन यांनी करून दिली. हा बदल सुरू असतानाच जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही आपल्या धोरणात बदल केले व त्याचा परिणाम वित्त तसेच गुंतवणूक क्षेत्रावर झाल्याचा दावा त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अधिकाधिक अंधकारमय होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. तर नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी, जागतिक अर्थव्यवस्थेचे विभाजन होत असल्याची भीती वर्तविली होती. त्यानंतर ‘ओईसीडी’ या गटानेही जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसणार असल्याचे बजावले होते.

हिंदी

leave a reply