इराणने इराकच्या सीमेजवळ तैनाती वाढविली

- इराककडून इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी

तैनाती वाढविलीतेहरान/बगदाद – इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना ‘दंगली’ आणि कुर्दांना ‘दहशतवादी’ ठरवून इराणने इराकमध्ये मोठ्या लष्करी कारवाईची तयारी केली आहे. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स’ने इराकच्या सीमेजवळ लष्करी वाहनांची तैनाती वाढविली आहे. त्याचबरोबर इराकमध्ये घुसून कारवाई करण्यासाठी ‘स्पेशल युनिट्स’ देखील सज्ज असल्याची घोषणा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केली. यानंतर सावध झालेल्या इराकने देखील इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर रवाना केले आहे. यामुळे इराक आणि इराण सीमेवरील तणाव वाढला आहे.

इराणमध्ये सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांना लक्ष्य करून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांना इराकमधील दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. काही दिवसांपूर्वी इराणच्या लष्कराने इराकच्या कुर्दिस्तान भागात रॉकेट हल्ले चढवून निदर्शनांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर इराकच्या लष्कराने दहशतवाद्यांची इराणमधील घुसखोरी रोखली नाही तर थेट इराकमध्ये लष्कर घुसविण्याचा इशारा इराणने दिला होता.

तैनाती वाढविलीइराणने इराकमध्ये चढविलेल्या या हल्ल्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्यात आला. गुरुवारी राष्ट्रसंघातील इराणच्या राजदूतांनी पत्राद्वारे दिलेल्या उत्तरामध्ये इराकमधील लष्करी कारवाईचे समर्थन केले. स्वसंरक्षणासाठी इराकमध्ये हल्ले चढविण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता, असा खुलासा इराणने संयुक्त राष्ट्रसंघाला दिला. त्याचबरोबर इराकमधील कुर्द गटांना दहशतवादी संघटना ठरविणाऱ्या इराणने आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत या दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे.

याला काही तास उलटत नाही तोच इराणने इराकच्या सीमेजवळ अतिरिक्त तैनाती सुरू केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समधील निमलष्करी पथकाचे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपूर यांनी इराकच्या सीमेजवळ चिलखती वाहने आणि स्पेशल फोर्सेसचे युनिट्स तैनात केल्याची माहिती दिली. इराणच्या हद्दीतील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही तैनाती केली. पुढच्या काळात आवश्यकता भासल्यास स्पेशल फोर्सेसचे जवान थेट इराकमध्ये घुसून कारवाई करतील, असे जनरल पाकपूर यांनी जाहीर केले.

काही तासांपूर्वीच इराकमध्ये सत्तासूत्रे हाती घेणाऱ्या पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी इराकच्या सुरक्षेसाठी इराण सीमेजवळ लष्कराची तैनाती वाढविणार असल्याचे जाहीर केले. इराकमधील कुर्दिस्तान प्रांतातील सरकार आणि पेशमर्गा मंत्रालयाच्या सहाय्याने इराकचे लष्कर पुढील कारवाई करणार असल्याची घोषणा इराकच्या पंतप्रधानांनी केली. इराणने इराकमधील कुर्द गटांना दहशतवादी जाहीर केले आहे. निदर्शनांच्या आडून इराणमध्ये विघटनवादी चळवळ मोठी करण्यासाठी या दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप इराण करीत आहे.

पण इराणमधील निदर्शनांशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा इराकमधील कुर्द नेते व संघटना करीत आहेत. तरी देखील इराण इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ल्याची तयारी करीत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला असून इराक-इराण युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी 1980-88 या दरम्यान इराक-इराणमध्ये पहिले युद्ध पेटले होते. जवळपास सहा लाख जणांचा या युद्धात बळी गेला होता. यात एक लाख नागरिकांचा समावेश होता.

leave a reply