अफगाण सीमेवर ताजिक जवान आणि तालिबानमध्ये संघर्ष

कुंदूझ/दुशांबे – अफगाणिस्तानच्या सीमाविवादावरून तालिबानचे शेजारी देशांबरोबर रोजच खटके उडू लागले आहेत. अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील सीमेवर ताजिकिस्तानचे जवान आणि तालिबान यांच्यात संघर्ष पेटला. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी अफगाण सीमेवरील तालिबानच्या कारवायांमुळे शेजारी देशांमध्ये दहशत पसरली आहे. ताजिकिस्तान प्रमाणे पाकिस्तान, इराण आणि उझबेकिस्तान या देशांच्या सीमेलाही तालिबान आव्हान देत आहेत.

गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमअली राहमोन यांच्यात बैठक पार पडली होती. अफगाणिस्तानच्या कुंदूझ प्रांतातील शेर खान बंदर या सीमेवर तैनात ताजिक जवान आणि तालिबान यांच्यामध्ये सदर बैठकीबाबत चर्चा सुरू होती. द्विपक्षीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलत असताना ताजिक जवान आणि तालिबानमध्ये हा संघर्ष भडकला. तालिबानने सर्वप्रथम गोळीबार केल्याचे ताजिकिस्तानच्या लष्कराचे म्हणणे आहे. यानंतर सुमारे चार तास दोघांमध्ये संघर्ष सुरू होता, असे अफगाणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

याआधीही कुंदूझ प्रांताच्या सीमेवर ताजिक जवान आणि तालिबान यांच्यात संघर्ष पेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. गेल्या आठवड्यात आयएस खोरासानच्या दहशतवाद्यांनी ताजिक भागात रॉकेट्सचे हल्ले चढविल्याची घटनाही समोर आली होती. कुंदूझ प्रांतावर आपले पूर्ण नियंत्रण नसल्याचा दावा तालिबान करीत आहे. पण खोरासानच्या दहशतवाद्यांनी याच भागातून ताजिकिस्तानमध्ये रॉकेटचे हल्ले चढविल्यानंतर तालिबानच्या वर्चस्वाला आव्हान मिळत असल्याचे स्पष्ट झाले होते. ताजिकिस्तानने देखील अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपली तैनाती वाढविली होती.

गेल्या काही दिवसांपासून ताजिकिस्तानच्या सुरक्षेला अंतर्गत आव्हाने मिळत आहेत. ताजिकिस्तानातील सरकार विरोधी दहशतवादी गट सक्रिय झाले असून त्यांनी ताजिक लष्करावर हल्ले सुरू केले आहेत. काही तासांपूर्वी गौर्नो-बादखशान प्रांतात दहशतवाद्यांनी ताजिक जवानांवर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये आठ जण ठार झाले. ताजिकिस्तानातील राष्ट्राध्यक्ष राहमोन यांचे सरकार उधळून लावण्यासाठी आणि अस्थैर्य माजविण्यासाठी दहशतवाद्यांकडून हे हल्ले सुरू असल्याचा दावा केला जातो. गौर्नो-बादखशान हा प्रांत अफगाणिस्तान आणि चीनच्या सीमेला भिडलेला आहे.

दरम्यान, ताजिकिस्तानातील हे अस्थैर्य तालिबान आणि आयएसच्या दहशतवाद्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. म्हणूनच रशियाने याआधी ताजिकिस्तानच्या सुरक्षेसाठी आपले सैन्य तैनात केले होते.

leave a reply