फिजीने चीनबरोबरचा ‘पोलीस’ करार मोडला

‘पोलीस’ करारकॅनबेरा – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील फिजी या बेटदेशामध्ये झालेल्या सत्ताबदलाचा सर्वात पहिला धक्का चीनला बसला आहे. फिजीच्या नव्या सरकारने चीनबरोबर 16 वर्षांपूर्वी केलेला पोलीस करार मोडीत काढला. ‘फिजीमधील लोकशाही आणि न्यायव्यवस्था वेगळी आहे. त्यामुळे फिजीसारखी यंत्रणा असणाऱ्या देशांबरोबर सहकार्य करण्यात येईल’, असे सांगून फिजीचे पंतप्रधान सितीवेनी रबूका यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची पोलीस यंत्रणा मान्य नसल्याचे ठणकावले.

2011 साली फिजीच्या सरकारने चीनबरोबर सुरक्षा विषयक सहकार्य करार केला होता. यानुसार चीनचे लष्करी अधिकारी फिजीमध्ये तैनात करून फिजीच्या पोलिसांना चीनमध्ये स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले होते. तर दोन वर्षांपूर्वी चीनने फिजीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तैनात केला होता. यामुळे फिजीची पोलीस यंत्रणा चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याची चर्चा सुरू झाली होती.

पण डिसेंबर महिन्यात फिजीमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर पंतप्रधान सितीवेनी रबूका आणि राष्ट्राध्यक्ष रातू विलिएम कातोनिवेरे यांनी देशाच्या धोरणात आक्रमक बदल केले. 24 तासांपूर्वी पंतप्रधान रबूका यांनी चीनबरोबरचा पोलीस करार मोडीत काढला.

फिजीमध्ये लोकशाही असल्याचे सांगून रबूका यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीबरोबर सहकार्य शक्य नसल्याचे घोषित केले. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या शेजारी देशांबरोबर सहकार्य वाढविण्याचे संकेत रबूका यांनी दिले. राष्ट्राध्यक्ष कातोनिवेरे यांनी याआधीच्या सरकारशी संलग्न असलेल्या पोलीस कमिश्नर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.

leave a reply