इजिप्तच्या भेटीने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांचा आखात दौरा सुरू

आखातकैरो – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इजिप्तपासून आपल्या आखात दौऱ्याची सुरुवात केली. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाढता तणाव, रशिया-युक्रेन युद्ध आणि इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, ब्लिंकन यांचा हा आखात दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी इजिप्त तसेच इस्रायल-पॅलेस्टाईनला भेट दिली होती.

याआधी इजिप्तनेच इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नेतृत्वात शांतीचर्चा घडविली होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इजिप्तपासून आपला आखात दौरा सुरू केला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन येत्या काही तासात इस्रायलमध्ये दाखल होणार आहेत. या दौऱ्यातून परराष्ट्रमंत्री ब्लिंकन इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष रोखण्याचा संदेश देणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या जेरूसलेम शहरात प्रार्थनास्थळ व संवेदनशील ठिकाणी झालेल्या गोळीबारात सात ज्यूधर्मियांचा बळी गेला होता. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने यावर शोक व्यक्त केला होता. या व्यतिरिक्त अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री सदर दहशतवादी हल्ल्याबाबत बायडेन प्रशासनाची कोणती भूमिका मांडतात, हे त्यांच्या या इस्रायलच्या दौऱ्यात स्पष्ट होईल.

leave a reply