फिनलँडकडून रशियन सीमेवर कुंपण उभारण्यास सुरुवात

Russian borderहेलसिंकी/मॉस्को – गेल्याच महिन्यात नाटोत 31वा सदस्य देश म्हणून सहभागी झालेल्या फिनलँडने रशियन सीमेवर तारांचे कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फिनलँडच्या माजी पंतप्रधान सना मरिन यांनी रशियन सीमेवरील ‘बॉर्डर फेन्सिंग प्रोजेक्ट’ला मंजुरी दिली होती. सीमाभागातील रशियाच्या कारवायांना आळा घालणे व निर्वासितांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हा यामागील उद्देश असल्याचे फिनलँडच्या यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

रशिया व फिनलँडमध्ये तब्बल 1,300 किलोमीटर लांबीची सीमा आहे. युरोप व आर्क्टिक अशा दोन्ही खंडात पसरलेल्या या सीमेमुळे फिनलँड हा रशियन सीमा जोडलेला सर्वात मोठा युरोपिय देश ठरतो. यापूर्वी युरोपातील ‘रिफ्युजी क्रायसिस’दरम्यान रशियाने फिनलँड सीमेवरील सुरक्षा काही प्रमाणात शिथिल केली होती. त्यामुळे आशिया व आखाती देशांमधून येणारे निर्वासित मोठ्या संख्येने फिनलँडमध्ये शिरले होते.

Russian border-1फिनलँडच्या तत्कालिन सरकारने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करून निर्वासितांच्या घुसखोरीवर तोडगा काढण्यात यश मिळविले होते. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फिनलँडने नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने दोन देशांमधील संबंध चांगलेच चिघळले आहेत. रशियाने फिनलँडनजिकच्या सीमेवरील आपली लष्करी तैनाती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात आर्क्टिक क्षेत्रातील तैनातीचाही समावेश आहे.

रशियाच्या या आक्रमकतेमुळे फिनलँडमध्ये चिंतेचे वातावरण असून सीमेवर काही गडबडी होऊ नये म्हणून कुंपण उभारणीसारखे उपाय हाती घेण्यात येत आहेत. रशिया-फिनलँडमधील 1,300 किलोमीटर्सच्या सीमाभागापैकी 200 किलोमीटर्सच्या भागात कुंपण व त्याबरोबर ‘सर्व्हिलन्स कॅमेरे’ उभारण्यात येणार आहेत. दोन देशांच्या सीमेवर असलेले ‘एन्ट्री पॉईंटस्‌‍’ व त्याच्याजवळचा परिसर यासाठी निवडण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत तीन किलोमीटर्सचे कुंपण पूर्ण होईल, असे फिनलँडच्या यंत्रणांकडून सांगण्यात आले.

रशिया-फिनलँडच्या 200 किलोमीटर्सच्या सीमेवर उभारण्यात येणाऱ्या कुंपणासाठी जवळपास 38 कोटी युरोंची तरतूद करण्यात आली असून 2026 सालापर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

leave a reply