जम्मू व काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत पाच जवान शहीद

श्रीनगर – जम्मू व काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय सैन्य व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तर पाच ठिकाणी दहशतवाद्यांबरोबर चकमकी सुरू होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

जम्मू व काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत पाच जवान शहीदगेल्या आठवड्यात पाच दिवसात दहशतवाद्यांनी सात निरपराध नागरिकांच्या हत्या घडविल्या होत्या. त्यानंतर सुरक्षा दल तसेच तपास यंत्रणांनी कसून तपास सुरू केला असून या प्रकरणी शेकडो जणांची धरपकड करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराने शोधमोहीम सुरू केली. पुंछ जिल्ह्यात या मोहिमेदरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात पाच जवान शहीद झाले. यामध्ये एका जुनिअर ऑफिसरचा समावेश असल्याची माहिती दिली जाते.

यानंतर सदर भागातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. इथे असलेल्या दहशतवाद्यांकडे प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. इथे लष्कराने घेतलेल्या वेढ्यामध्ये चार ते पाच दहशतवादी सापडू शकतात, अशी शक्यता वर्तविली जाते. दरम्यान, अनंतनाग व बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत प्रत्येकी एक दहशतवादी ठार झाला. अनंतनागमध्ये ठार झालेला दहशतवादी तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत सहभागी झाला होता.

याबरोबरच त्रालमध्ये एक आईडी सापडला असून तो वेळी निकामी करण्यात आल्याने घातपात टळला. तर नारगोटा येथे दोन दहशतवादी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर, त्यांच्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आलेली आहे. शोपियान जिल्ह्यात देखील सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. तर राजौरी येथेही अशीच चकमक सुरू असल्याची माहिती दिली जाते. यामुळे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली असून तपास यंत्रणा देखील दहशतवाद्यांच्या मागावर असल्याचे समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात सातजणांच्या हत्येचे प्रकरण केंद्र सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतले असून सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. याचे परिणाम दिसू लागले असून काही दहशतवादी ठार झाले आहेत. तर या प्रकरणात शेकडो संशयितांना अटक झाली असून यातूनही अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे दावे केले जातात.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने जम्मू व काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू करण्यासाठी नवे गट तयार केले आहेत. हे दहशतवादी पिस्तूलासारख्या छोट्या शस्त्रांचा वापर करून हत्या घडवित आहेत व त्यामागे आयएसआयचाच कट असल्याचे धरपकड करण्यात आलेल्या संशयितांकडून कळल्याचे दावे केले जातात.

leave a reply