पुरात बुडालेल्या पाकिस्तानला भारताकडून आयात करावी लागेल

- पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे संकेत

इस्लामाबाद – अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराने पाकिस्तानची दैना उडविली आहे. बलोचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनवालासह दक्षिण पंजाबमध्ये महापूराचे थैमान सुरू असून आत्तापर्यंत यात 1100 जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. बऱ्याच ठिकाणची घरे, दुकाने, रस्ते व पूल देखील या पूरात वाहून गेले आहेत. सिंध व बलोचिस्तानमधील शेतीच या पूराने उद्ध्वस्त करून टाकली. यामुळे पाकिस्तानात सध्या कांदे 400 रुपये, तर टॉमेटो 500 रुपये किलो इतक्या दराने खरेदी करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला भारताची आठवण झाली असून आपल्या देशाला भारताकडून भाज्या व इतर खाद्यान्नाची आयात करावी लागेल, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी म्हटले आहे.

इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी भारताकडून भाज्या व इतर गोष्टींची आयात केली जाऊ शकते, असे जाहीर केले. याआधीही मिफ्ता इस्माईल तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताबरोबर व्यापार करण्याचे संकेत दिले होते.

Flood-ravaged-Pakistanया प्रस्तावाला कडाडून विरोध करणारे भारतद्वेष्टे पाकिस्तानात आहेत. मात्र सध्याच्या पूराने त्यांचीही अवस्था बिकट बनविलेली आहे. अशा स्थितीत भारताकडून आयात केली नाही, तर पाकिस्तानी जनतेची उपासमार होऊ शकते. मुख्य म्हणजे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने निर्माण झालेली टंचाई व यामुळे भडकलेल्या महागाईवर पाकिस्तानकडे दुसरे उत्तर नाही. केवळ भारत पाकिस्तानला प्रचंड प्रमाणात आवश्यक गोष्टींचा पुरवठा करू शकतो. याची जाणीव झालेल्या पाकिस्तानच्या सरकारने यासाठी आता उघडपणे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानातील महापूरावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या पूरात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांनी लवकरच पाकिस्तानातील परिस्थिती सामान्य पातळीवर येईल, असा विश्वास भारताच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. तर युएई आणि तुर्की या देशांनी पाकिस्तानी जनतेसाठी सहाय्य पुरविले आहे. पण याने पाकिस्तानचे प्रश्न सुटणार नाहीत. पूर ओसरल्यानंतर पुढच्या काळात पाकिस्तानला अधिक भीषण समस्यांचा सामना करावा लागेल. यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी हात पसरले आहेत.

अशा परिस्थितीत भारताकडून आवश्यक गोष्टींची आयात सुरू करण्याची तयारी पाकिस्तानच्या सरकारने केली आहे. मात्र पाकिस्तानच्या या मागणीला भारताकडून प्रतिसाद मिळेल का, हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेतल्यानंतर, पाकिस्तानात त्यावेळी सत्तेवर असलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने भारताबरोबरील व्यापारी सहकार्यातून माघार घेतली होती. अगदी भाज्या, फळे व अन्नधान्य देखील भारताकडून खरेदी करायचे नाही, असा टोकाचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला होता. भारतीय औषधांच्या आयातीवरही या सरकारने बंदी टाकली होती. मात्र काही औषधांना दुसरा पर्यायच नसल्याने याची आयात सुरू ठेवण्याचा निर्णय इम्रान खान यांच्या सरकारने घेतला होता.

Import-from-Indiaत्यांचा हा निर्णय पाकिस्तानला भलताच महाग पडला. यामुळे पाकिस्तानात भाज्या व फळांपासून ते औषधांपर्यंतच्या अनेक गोष्टींची टंचाई जाणवत होती. आर्थिक आघाडीवर हा बहिष्कार सुरू असताना, पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड भारताने आपल्याशी क्रिकेट खेळावे असे साकडे घालत होते. मग असल्या बहिष्काराला काय अर्थ उरतो? अशी टीका पाकिस्तानातूनच सुरू झाली होती. तरीही पाकिस्तानच्या त्यावेळच्या सरकारचे धोरण बदलले नव्हते.

इम्रान खान यांचे सरकार गडगडून आता पाकिस्तानात विरोधी पक्षांची एकजूट असलेल सरकार आले आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना, हे सरकार पाकिस्तानचे गाडे रूळावर आणण्यासाठी आपल्यापरिने शक्य तितकी धडपड करीत आहे. यासाठी भारताबरोबर व्यापार सुरू करण्यावाचून गत्यंतर नाही, याची पूर्ण कल्पना या सरकारला आहे. मात्र राजकीयदृष्ट्या हा निर्णय या सरकारसाठी महाग पडू शकतो. सध्या विरोधी पक्षनेते असलेले इम्रान खान याचा वापर करून पाकिस्तानचे सरकार भारतधार्जिणे असल्याचा ठपका ठेवू शकतात, ही भीती या सरकारला वाटत आहे.

तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या लष्कराने भारतविरोधी दहशतवादी कारवाया अजूनही सोडून न दिल्याने, भारताने देखील पाकिस्तानशी वाटाघाटी व व्यापार सुरू करण्यासाठी उत्सुकता दाखविलेली नाही. मात्र पाकिस्तानात आलेल्या पूरानंतर, जीवनावश्यक गोष्टींच्या आयातीसाठी या देशाच्या सरकारने विनंती केली, तर त्यावर त्याला नकार देण्याचा कठोरपणा भारत दाखविल का, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ शकतो. मात्र भारताला यावर निर्णय घेण्याच्या आधी पाकिस्तानला अधिकृत पातळीवर भारताकडे तशी मागणी करावी लागेल. अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी तसे संकेत दिले असले तरी पाकिस्तानातून त्यावर जहाल प्रतिक्रिया उमटल्या, तर ते आपली मागणी मागे घेऊ शकतात.

याआधीही पाकिस्तानने भारताबरोबर व्यापार सुरू करण्याचे संकेत देऊन नंतर त्यापासून फारकत घेतल्याचे समोर आले होते. मात्र यावेळी महापूरामुळे आलेल्या संकटाचा विचार करता, भारताकडून आयात न करणे पाकिस्तानच्या भवितव्यावर परिणाम करणारी बाब ठरू शकते.

leave a reply