शीतयुद्धानंतर प्रथमच आण्विक महासंग्रामाची स्थिती निर्माण झाली आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

Biden-Putinवॉशिंग्टन/मॉस्को – ‘युक्रेनवरील आक्रमणादरम्यान अण्वस्त्रांचा वापर करु अशा शब्दात इशारा देणारे पुतिन पोकळ धमक्या देत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. क्युबातील क्षेपणास्त्रांच्या संकटानंतर प्रथमच अण्वस्त्रांचा थेट वापर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. छोट्या पल्ल्याच्या अण्वस्त्रांचा वापर केल्यास आण्विक महासंग्रामाचा भडका उडणार नाही, असे मानणे चुकीचे ठरते’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नजिकच्या काळात अणुयुद्ध पेट घेऊ शकते असा इशारा दिला. रशिया-युक्रेन मुद्यावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अणुयुद्धाची शक्यता वर्तविण्याची गेल्या 15 दिवसांमधील ही दुसरी वेळ ठरते.

गेल्या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, अणुयुद्धाबाबत देण्यात येणारे इशारे पोकळ नसल्याचे बजावले होते. ‘पाश्चिमात्य देश रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देत आहेत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे. जर रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल. मी हवेत बोलत नाही, याची जाण पाश्चिमात्यांनी ठेवावी’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती.

nuclear superangramपुतिन यांच्या वक्तव्यावर पाश्चिमात्य देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ब्रिटनच्या मंत्र्यांनी रशियाची धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, असे म्हटले होते. तर अमेरिकेने रशियाला संदेश पाठवून इशारा दिल्याचे दावे माध्यमांनी केले होते. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उघडपणे रशियाला परिणामांना सामोरे जाण्यावरून इशारा दिला होता. परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. ‘रशियाने अण्वस्त्रे वापरली तर त्याचे भयावह परिणाम रशियाला भोगावे लागतील’, असा खरमरीत इशारा ब्लिंकन यांनी दिला होता. रशियाच्या अण्वस्त्रहल्ल्यांना अमेरिका निर्णायक प्रत्युत्तर देईल, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी बजावले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्येच रशिया अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे संकेत दिले होते. पुतिन यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रशियाने ‘सरमात’ या अण्वस्त्राची नवी चाचणी घेऊन सज्जता दाखवून दिली होती. त्यानंतर आता सहा महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून अणुयुद्धाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

leave a reply