रशियाच्या सहकार्यामुळे इराण ऊर्जा केंद्र बनेल

इराणच्या इंधनमंत्र्याचा दावा

मॉस्को/तेहरान – इंधन आणि इंधनवायूच्या देवाणघेवाणीवर रशिया आणि इराणमध्ये एकमत झाले आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत रशिया व इराणमध्ये हे सहकार्य प्रस्थापित होईल. रशियाच्या या सहकार्यामुळे इराण या क्षेत्रातील उर्जा केंद्र बनू शकतो, अशी घोषणा इराणचे इंधनमंत्री जावेद ओवजी यांनी केली. सौदी अरेबिया पुरस्कृत इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक प्लस’ संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेसमोरील अडचणी वाढत असताना रशिया-इराणमधील सदर सहकार्य लक्षवेधी ठरत आहे.

iran russia gas dealरशियाच्या मॉस्कोमध्ये ‘कॅस्पियन इकोनॉमिक फोरम’ची बैठक सुरू आहे. यानिमित्ताने इराणचे इंधनमंत्री जावेद ओवजी आणि रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवॅक यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. याआधी रशिया आणि इराणमध्ये पार पडलेल्या इंधन सहकार्याचा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला होता. तसेच इंधन आणि नैसर्गिक इंधनवायूच्या देवाणघेवाणीबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

रशिया व इराण, दोघेही इंधनवायूचे मोठे निर्यातदार देश आहेत. येत्या काळात उभय देशांमधील इंधनवायूची देवाणघेवाण महत्त्वाची ठरेल, असा दावा इराणच्या इंधनमंत्र्यांनी केला. तर या सहकार्याच्या पहिल्या टप्प्यात प्रतिवर्ष 50 लाख टन इंधन आणि दहा अब्ज क्युबिक मीटर्स इंधनवायूची देवाणघेवाण होईल, अशी माहिती रशियाचे उपपंतप्रधान नोवॅक यांनी दिली. इंधन व इंधनवायूची वाहतूक, त्याचा साठा आणि बाजारभाव यावर चर्चा होणार असल्याचेही नोवॅक म्हणाले.

इराणच्या उत्तरेकडून रेल्वे व त्यानंतर कॅस्पियन समुद्र आणि पाईपलाईनच्या माध्यमातून इंधन व इंधनवायूचा पुरवठा होणार आहे. रशियाची सरकारी इंधन कंपनी ‘गाझप्रोम’ तर इराणची ‘नॅशनल इरानीयन ऑईल कंपनी’ या कंपन्यांमध्ये याबाबतचा करार पार पडला होता. त्यामुळे लवकरच हे सहकार्य सुरू होईल वर्षाच्या खेरीपर्यंत ते पूर्ण होईल असा दावा इराण करीत आहे. हा 40 अब्ज डॉलर्सचा करार असल्याचा दावा इराणच्या माध्यमांनी केला होता. यानंतरही इराण रशियाबरोबर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आणखी काही करार करणार आहे.

दरम्यान, काही तासांपूर्वीच ‘ओपेक प्लस’ या गटाने कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 20 लाख बॅरल्सनी घटविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रशियाचा मोठा राजनैतिक विजय असल्याचा दावा केला जातो. इंधन उत्पादक देशांचा निर्णय अदूरदर्शी असून त्यांनी रशियाचे हितसंबंध जपणारी भूमिका स्वीकारल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला होता. त्यातच रशियाने इराणबरोबर केलेले ऊर्जा सहकार्य पाश्चिमात्य देशांच्या चिंतेत भर टाकणारे ठरू शकते.

leave a reply