सलग दुसऱ्या दिवशी उत्तर कोरियाकडून तोफांचा मारा

लष्कराला युद्धसज्ज राहण्याचे उत्तर कोरियाची सूचना

kim missilesसेऊल – उत्तर कोरियाच्या लष्कराने सलग दुसऱ्या दिवशी ‘ईस्ट सी’च्या क्षेत्रात रॉकेट्स आणि तोफांचा मारा केला. अमेरिका आणि दक्षिण कोरियन लष्करात सुरू असलेल्या लाईव्ह फायर युद्धसरावाला चोख उत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्कराला युद्धसज्ज राहण्याची सूचना केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सिनेटने दक्षिण कोरियात किमान २८,५०० जवानांची तैनाती आवश्यक असल्याचे जाहीर केले. यामुळे कोरियन क्षेत्रातील तणाव वाढला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करात नवा युद्धसराव सुरू झाला आहे. या सरावात दक्षिण कोरियाच्या लष्कराने लाईव्ह फायरचा सराव केला. यावेळी डागण्यात आलेले रॉकेट्स उत्तर कोरियाच्या दक्षिणेकडील कँगवॉन प्रांताच्या सागरी हद्दीजवळ कोसळले. यावर खवळलेल्या उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या प्रक्षोभक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे जाहीर केले. लवकरच मोठी लष्करी कारवाई केली जाईल, अशी घोषणा उत्तर कोरियाच्या लष्कराने केली.

South-Korea-missile-systemत्यानंतर काही तासात, सोमवारी १३० तोफांचे गोळी दक्षिण कोरियाच्या दोन्ही सागरी क्षेत्रांजवळ कोसळले. ही कारवाई करून उत्तर कोरियाने २०१८ सालच्या लष्करी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला. पण याकडे दुर्लक्ष करून उत्तर कोरियाने मंगळवारी देखील तोफांचा मारा केला. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची रंगीत तालीम असल्याचा आरोप उत्तर कोरिया करीत आहे. याआधी देखील अमेरिकेचा अणुहल्ल्याची तयारी करीत असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवल होता.

उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवाया या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असल्याची टीका अमेरिका करीत आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरियामध्ये सैन्यतैनाती वाढविणे आणि जपानबरोबर नवे लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याला अमेरिका महत्त्व देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधी निर्बंधांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत ठराव मांडला होता. पण चीन व रशियाने नकाराधिकार वापरून उत्तर कोरियाचा बचाव केला होता. अमेरिकेच्या लष्करी हालचाली उत्तर कोरियाला चिथावणी देत असल्याचा प्रत्यारोप चीन व रशियाने केला होता.

leave a reply