तालिबानच्या नेत्यांनी युएईच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली

अबु धाबी – अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांची भेट घेतली. तालिबानच्या नेत्याने युएईसारख्या बड्या अरब देशाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. युएई लवकरच तालिबानला आणि अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देईल, असे दावे या निमित्ताने केले जात आहेत.

mbz yakoobतालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याचा मुलगा मुल्ला याकूब याने तालिबानच्या इतर नेत्यांबरोबर युएईचा दौरा केला. तालिबान आणि अफगाणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या संरक्षणमंत्र्याने रविवारी अबु धाबी येथे युएईचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली. यावेळी तालिबानमधील ‘हक्कानी नेटवर्क’चा दुसऱ्या क्रमांकाचा नेता अनस हक्कानी देखील उपस्थित होता. युएई आणि अफगाणिस्तानातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर तसेच महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा पार पडल्याचे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.

अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर तालिबानच्या नेत्यांनी मोठ्या संख्येने आखाती देशांचे दौरे केले आहेत. कतारची राजधानी दोहा येथे तालिबानचे राजकीय कार्यालय असल्यामुळे तालिबानचे नेते वरचेवर कतारला भेट देत असतात. तर तालिबानच्या काही नेत्यांनी युएईचे देखील दौरे केले होते. या भेटींमध्ये तालिबानच्या नेत्यांनी आखाती देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. पण मुल्ला ओमरचा मुलगा आणि तालिबानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने थेट युएईच्या राष्ट्रप्रमुखांशी घेतलेली भेट माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

युएई लवकरच तालिबान आणि अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देऊ शकते. याबाबत युएईचे राष्ट्रप्रमुख आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे. युएई किंवा तालिबानने याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानची वकिली करणाऱ्या पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे टाळले आहे. तर तालिबानसाठी राजकीय कार्यालय उभारून देणाऱ्या कतारने देखील या मुद्याला बगल दिली आहे. अशा परिस्थितीत तालिबानच्या नेत्याची युएई भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply