कझाकस्तानच्या ‘तेन्गिझ ऑईल फिल्ड’मधील स्फोटात दोघांचा बळी

Explosion-rocks-Kazakhstanनूर सुल्तान – मध्य आशियातील कझाकस्तानमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या ‘तेन्गिझ’ तेलक्षेत्रात झालेल्या स्फोटात दोन जणांचा बळी गेला. मंगळवारी सकाळी एक चाचणी सुरू असताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. कझाकस्तान हा जगातील आघाडीच्या तेल निर्यातदार देशांमधील एक असून प्रतिदिनी सुमारे 15 लाख बॅरल्स कच्चे तेल निर्यात करतो. मात्र स्फोटामुळे यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. स्फोटापूर्वी एक दिवस आधी रशियाने कझाकस्तानमधील तेल वाहून नेणारी इंधनवाहिनी पुढील 30 दिवस बंद ठेवण्यात येईल, असे जाहीर केले होते.

Explosion-Kazakhstanकझाकस्तान हा मध्य आशियाई क्षेत्रातील इंधनसंपन्न देश आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 60 टक्क्यांहून अधिक प्रमाण इंधनाच्या निर्यातीचे आहे. कझाकस्तानच्या जीडीपीमधील 25 टक्के वाटा इंधनक्षेत्राचा आहे. जगातील इंधन उत्पादक देशांमध्ये कझाकस्तान 19व्या क्रमांकावर आहे. मात्र असे असले तरीही इंधनाच्या निर्यातीसाठी हा देश रशियावर अवलंबून आहे. रशियाच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या ‘कॅस्पियन पाईपलाईन’मधून कझाकस्तानचे तेल पाश्चिमात्य देशांमध्ये निर्यात होते.

Kazakhstanया पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव्ह यांनी नजिकच्या काळात युरोपिय देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्याची घोषणा केली होती. ही घोषणा रशियाच्या नाराजीचे कारण ठरल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो. राष्ट्राध्यक्ष तोकायेव्ह यांच्या घोषणेनंतर 48 तासांमध्ये ‘कॅस्पियन पाईपलाईन’ बंद ठेवण्याचा निर्णय रशियाने घेतला. त्यानंतर ‘तेन्गिझ’ तेलक्षेत्रात स्फोटाच्या घटना समोर येत आहेत. हेे कझाकस्तान व युरोपमधील वाढत्या सहकार्याला रशियाने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानने लुहान्स्क व डोनेत्स्क या संघराज्यांना मान्यता देण्यासही नकार दिला होता. त्यामुळेही रशिया कझाकस्तानवर नाराज असावा, असाही दावा करण्यात येतो.

leave a reply