भारताचे परराष्ट्र सचिव नेपाळच्या भेटीवर

काठमांडू – भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला नेपाळ दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी नेपाळचे परराष्ट्र सचिव भरत राज पौडियाल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्यावर एकवाक्याता झाली. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत- नेपाळ संबंध ताणले गेले होते. नेपाळच्या पंतप्रधानांची चीन धार्जिनी धोरणे आणि भारताच्या हिताला धक्का पोहोचविणारे निर्णय यासाठी कारणीभूत ठरले होते. मात्र नेपाळचे सूर आता बदलू लागले असून नेपाळवर वाढलेला चीनचा प्रभाव कमी करण्यात यश मिळत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या नेपाळ दौऱ्याला विशेष महत्व आले आहे.

परराष्ट्र सचिव

काही महिन्यांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारतीय भूभागावर दावा करीत नेपाळचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात भारताचे कालापानी, लिपुलेख, लिम्पियाधुरा हे भाग नेपाळच्या नकाशात दाखविण्यात आले होते. यावर भारताने तिव्र आक्षेप घेत नेपाळचा दावा धुडकावला होता. तसेच नेपाळला भारताबरोबर चर्चा हवी असल्यास यासाठी नेपाळने तसे वातावरण तयार करावे लागेल, असे भारताने स्पष्ट बजावले होते.

चीनधार्जिनी धोरणे असलेल्या के.पी.ओली यांनी यानंतरही भारताच्या हिताला तडा जाईल, अशा निर्णयाचा सपाटा लावला होता. यामध्ये नेपाळच्या सिटीझनशिप कायद्यात बदल, संसदेत हिंदी भाषेला विरोध, भारत-नेपाळ सीमेवर सैनिकांची संख्या आणि सीमा चौक्यांमध्ये केलेली वाढ, बिहार सीमेवर भारतीय नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे हे संबंध आणखीनच ताणले गेले होते. मात्र चीनकडून नेपाळच्या जमिनीवर झालेले अतिक्रमणाची बाब उघड झाल्यावर ओली सरकारला मोठी टिका सहन करावी लागली होती. चीनकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान ओली यांच्या धोरणांवर विरोधकांबरोबर जनतेकडूनही टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर नवा नकाशा असलेल्या पठ्यापुस्तकांचे वाटप थांबवून पहिल्यांदा ओली सरकारने भारताबरोबर संंबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. तसेच भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नेपाळने मानद जनरल पद बहाल केले होते.

याआधी भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’च्या प्रमुखांचीही भेट पंतप्रधान के.पी.ओली यांनी घेतली होती. तसेच जनरल नरवणे यांच्या भेटीत भारताबरोबरील पुरातन संबंधांचा दाखला देताना दोन्ही देश कोणताही वाद चर्चेने सोडवतील, असा विश्‍वास पंतप्रधान ओली यांनी व्यक्त केला होता.

या पार्श्‍वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला नेपाळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. नेपाळच्या धोरणांवर वाढलेला चीनचा प्रभाव कमी करण्यात भारताला यश मिळत आहे, यादृष्टीने या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. ‘आपल्याला याआधीच नेपाळमध्ये यायचे होते, मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. परराष्ट्र सचिव म्हणून माझा पहिलाच नेपाळ दौरा आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत आणि हे आणखी कसे मजबूत होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत’, असे परराष्ट्र सचिव श्रृंगला म्हणाले.

परराष्ट्र सचिव श्रृंगला हे नेपाळचे पंतप्रधान ओली आणि परराष्ट्रमंत्री प्रदिप ग्यावली यांचीही भेट घेऊन चर्चा केली. मात्र यावेळच्या चर्चेचे तपशिल जाहिर झालेले नाहीत. दरम्यान, 2015 सालच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या तीन शाळांची उभारणी भारताने काठमांडूमध्ये करून दिली असून या शाळांच्या इमातींचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे.भारताने नेपाळमध्ये भूकंपानंतर गोरखांसाठी 50 हजार घरे बांधली असून यातील 40 हजार घरे पुर्ण झाली आहेत.

leave a reply