जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या परिंपेोरा येथे लष्कराच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला असून यात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 26/11च्या स्मरणदिनाची केलेली निवड भारताला संदेश देण्यासाठीच असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे या दहशतवादी हल्ल्याद्वारे आपण भारतावर घाव घालण्यासाठी दहशतवादाचा वापर करीतच राहू, असा इशारा पाकिस्तानकडून आल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत.

दोन जवान शहीद

भारतीय लष्कराच्या ‘क्विक रिॲक्शन टीम’च्या (क्यूआरटी) पथकाला घेऊन जाणाऱ्या वाहनावर दुसऱ्या एका वाहनातून हल्ला चढविण्यात आला. यावेळी गोळीबार करून दहशतवाद्यांनी दोन जवानांना शहीद केले. हा हल्ला चढवून पळ काढण्यात दहशतवाद्यांना यश मिळाल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा माग काढला जात असल्याची माहिती दिली जात आहे. यासाठी हल्ला झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

हा हल्ला कुठल्या दहशतवादी संघटनेने केला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यासाठी ‘लश्‍कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना जबाबदार असाव्या, असा संशय व्यक्त केला जातो. तसेच हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केल्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. लवकरच जम्मू व काश्‍मीरमध्ये पंचायत निवडणूका पार पडणार आहेत. कलम 370 मागे घेतल्यानंतरही भारत सरकारला या निवडणूका पार पाडण्यात यश मिळाले, तर त्याने पाकिस्तानला फार मोठा धक्का बसू शकतो.

भारत जम्मू-काश्‍मीरच्या जनतेवर अत्याचार करून त्यांची मुस्कटदाबी करीत असल्याचा अपप्रचार पाकिस्तान जगभरात करीत आहे. अशा परिस्थितीत जम्मू व काश्‍मीरच्ा जनतेने पंचायत निवडणुकीत सहभाग घेतला तर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगभरात सिद्ध होईल. याच कारणामुळे पाकिस्तान काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करून सर्वसामान्य जनतेला लक्ष्य करीत आहे. भारताशी सहकार्य करू नका, अशी धमकी याद्वारे पाकिस्तानला द्यायची असल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत.
यासाठी जम्मू व काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना आसुसलेल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत जम्मू व काश्‍मीरमध्ये मोठा घातपात घडविण्याची या दहशतवाद्यांची कारस्थाने उधळण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. पुढच्या काळात दहशतवादी संघटना पंचायत निवडणुकीला लक्ष्य करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

leave a reply