‘आयएसआय’च्या माजी प्रमुखांकडून पाकिस्तानला ‘घरचा आहेर’

इस्लामाबाद – ढासळती अर्थव्यवस्था, राजकीय अस्थैर्य आणि सामाजिक तेढ, ही पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे पाकिस्तानला भारतापासून धोका नाही, तर अंतर्गत पातळीवरील ही आव्हाने पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचा निर्वाळा ‘आयएसआय’चे माजी प्रमुख असद दुरानी यांनी दिला आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारला दुरानी यांनी हा ‘घरचा आहेर’ दिल्याचे दिसत आहे.

‘घरचा आहेर’

1990 ते 1993 या काळात पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे प्रमुख असलेल्या असद दुरानी यांनी आपला देश भयंकर स्थितीत असल्याचे मान्य केले. सौदी अरेबिया व इराण आणि तुर्की या देशांमधले वैर पाकिस्तानसाठी घातक ठरत असून हे पाकिस्तानसमोर खडे ठाकलेले नवे आव्हान ठरते, असे दुरानी म्हणाले. त्याचवेळी भारत पाकिस्तानसाठी कधीही मोठा धोका नव्हता, असेही एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दुरानी यांनी स्पष्ट केले. अंतर्गत पातळीवर पाकिस्तानला मिळणारी आव्हाने अधिक बिकट असल्याचे सांगून दुरानी यांनी पाकिस्तानातील परिस्थितीवर प्रकाश टाकला.

पाकिस्तानसमोर अंतर्गत पातळीवर तीन प्रमुख आव्हाने आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे. त्यावचेळी राजकीय अस्थैर्य आणि सामाजिक तेढ या समस्या पाकिस्तानात तीव्र बनल्या आहेत. बलोचिस्तानसारख्या प्रांतामधील जनतेमध्ये परकेपणाची भावना निर्माण झालेली आहे. अशा काळात पाकिस्तानच्या सरकारनेही विश्‍वासार्हता गमावलेली आहे. कारण हे सरकार लोकनियुक्त नसून लष्करानेच नियुक्त केलेले असल्याची जनभावना आहे, असे दुरानी पुढे म्हणाले.

पाकिस्तानच्या लष्करानेच इम्रान खान यांना पंतप्रधानपदावर बसविले, असे पाकिस्तानी जनतेला वाटत आहे. हेच पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरते. पाकिस्तानचे लष्कर देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करीत आले आहे आणि हे नाकारता येणार नाही. त्याचे फार मोठे दुष्परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत, अशी कबुलीही असद दुरानी यांनी दिली.

पाकिस्तानी लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल असलेल्या असद दुरानी यांचे ‘ऑनर अमंग स्पायज्‌’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या निमित्ताने चर्चेत असलेल्या दुरानी यांनी पाकिस्तानसमोरी आव्हानांवर व्यक्त केलेले हे परखड विचार या देशाचे सरकार तसेच लष्कराला अडचणी टाकणारे आहेत. पाकिस्तानच्या साऱ्या समस्यांचे मूळ भारत असून भारतच पाकिस्तानमध्ये अस्थैर्य माजवित असल्याचा आरोप या देशाची लष्करी व्यवस्था करीत आली आहे. त्याचवेळी भारताकडूनच पाकिस्तानला सर्वाधिक धोका असल्याचे सांगून पाकिस्तानचे लष्कर या देशात राजकीय हस्तक्षेप करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान इम्रानखान व त्यांचे मंत्री तसेच लष्कराचे हस्तक असलेले पत्रकार देखील भारत पाकिस्तानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे दावे ठोकत आहेत. पण प्रत्यक्षात पाकिस्तानचे लष्करच काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करून तणाव निर्माण करीत आहे.

मात्र आजवर यशस्वी ठरलेले पाकिस्तानी लष्कराचे हे प्रचारतंत्र आता अपयशी ठरू लागले असून विरोधी पक्षनेते आता उघडपणे पाकिस्तानी लष्कराला विरोध करू लागले आहेत. महागाई व बेरोजगारीने हैराण झालेली पाकिस्तानची जनताही इम्रान खान यांच्यासह लष्कराला धारेवर धरत आहे. अशा काळात असद दुरानी यांनी पाकिस्तानच्या मूळ समस्येवर ठेवलेले बोट, या देशाच्या लष्कर तसेच लष्करधार्जिण्या व्यवस्थेच्या अडचणीत अधिकच भर टाकणारे ठरत आहे.

leave a reply