बायडेन यांच्या ‘अमेरिका इज बॅक’वर माजी परराष्ट्रमंत्र्यांची घणाघाती टीका

वॉशिंग्टन – ‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांची धोरणे बदलून ‘अमेरिका इज बॅक’ची घोषणा केलेली आहे खरी. मात्र याचा अर्थ सिरियामध्ये ‘आयएस’ची खिलाफत परतणार का? चीनला पुन्हा अमेरिकेच्या विरोधात मोकळे रान मिळेल का? इराणच्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन इस्रायलसारख्या अमेरिकेच्या सहकारी देशाची सुरक्षा धोक्यात आणली जाईल का?’’ अशी घणाघाती प्रश्‍नांची फैर माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी झाडली आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘अमेरिका इज बॅक, डिप्लोमसी इज बॅक’ अशी घोषणा केली होती. यावेळी बायडेन यांनी चीनबरोबर काही ठिकाणी जुळवून घेण्याचे व तर रशियाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले होते. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणचा उल्लेख करण्याचे टाळले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे बदलणार्‍या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या भूमिकेवर माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी मुलाखतीद्वारे जोरदार ताशेरे ओढले.

‘अमेरिका इज बॅक याचा अर्थ ब्रिटनच्या आकाराएवढा सिरियातील भूभाग ताब्यात घेणार्‍या ‘आयएस’ची खिलाफत परतणार का? माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने ‘आयएस’ची ही खिलाफत मोडून काढली होती’, याची आठवण पॉम्पिओ यांनी करून दिली. त्याचबरोबर ‘अमेरिका इज बॅक म्हणजे चीनला पुन्हा एकदा मोकळे रान करून द्यायचे का? कॅन्सास आणि साऊथ कॅरोलिना सारख्या प्रांतातील लाखो रोजगार नष्ट करणे, असा तर त्याचा अर्थ होत नाही ना?’, असे सांगून पॉम्पिओ यांनी चीनबरोबर जुळवून घेण्याचे संकेत देणार्‍या बायडेन प्रशासनाला त्याच्या परिणामांची आठवण करून दिली.

त्याचबरोबर चीनमधील जिनपिंग यांची राजवट अल्पसंख्यांकावर करीत असलेल्या अत्याचारावरही पॉम्पिओ यांनी टीका केली. ट्रम्प यांनी चीन करीत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविला होता. चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदारीने चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारावी आणि बायडेन प्रशासनाने देखील ट्रम्प यांच्या प्रमाणेच चीनविरोधात आक्रमक निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा पॉम्पिओ यांनी व्यक्त केली. तसेच बायडेन यांच्या रशियाबाबतच्या धोरणावर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी सडकून हल्ला चढविला.

२०१७ सालच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप करून ट्रम्प यांना निवडून आणले, हा आरोपच हास्यास्पद असल्याचे पॉम्पिओ म्हणाले. त्यावेळी अमेरिकेत ओबामा यांचे प्रशासन होते आणि बायडेन हेच उपराष्ट्राध्यक्ष होते, याची आठवण पॉम्पिओ यांनी करून दिली. तर ओबामा यांच्या प्रशासनातच रशियाने क्रिमिआचे लचके तोडले होते, याकडेही पॉम्पिओ यांनी लक्ष वेधले. तर इराणविषयी बायडेन यांच्या धोरणावरही पॉम्पिओ यांनी आपले परखड मत मांडले.

अमेरिकेच्या विरोधात घातपाताचा कट आखणार्‍या इराणच्या जनरल कासेम सुलेमानी यांना ठार करून ट्रम्प प्रशासनाने योग्यच केले, असे पॉम्पिओ यांनी ठासून सांगितले. २०१५ साली ओबामा प्रशासनाने इराणबरोबर केलेला अणुकरार हा इस्रायल तसेच आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठी त्याचबरोबर अमेरिकेच्या जनतेसाठी देखील सर्वात मोठी आपत्ती होती, अशी टीका पॉम्पिओ यांनी केली.

‘अमेरिका इज बॅक याचा अर्थ इस्रायल आणि त्यासारख्या मित्रदेशांना दूर करून इराणच्या दहशतवाद्यांना एखाद्या मित्राप्रमाणे १५० अब्ज डॉलर्सची रोख रक्कम पुरविणार का? बराक ओबामा यांच्या आठ वर्षांच्या काळात जे काही घडले ते अमेरिकन जनता पुन्हा खपवून घेणार नाही, असे मला वाटते’, असा विश्‍वास पॉम्पिओ यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply