भारत व अफगाणिस्तानमध्ये ‘व्हर्च्युअल समिट’ संपन्न

नवी दिल्ली/काबुल – मंगळवारी भारत व अफगाणिस्तानच्या नेत्यांमध्ये ‘व्हर्च्युअल समिट’ संपन्न झाली. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्यासह दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी अफगाणिस्तानमधील वाढत्या हिंसेवर चिंता व्यक्त करून संघर्षबंदीचे आवाहन केले. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत आपले पूर्ण योगदान देईल, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी दिली. या समिटमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात उभारण्यात येणार्‍या धरणाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍याही करण्यात आल्या.

‘भारत व अफगाणिस्तान या दोन्ही देशांना हे क्षेत्र दहशतवादापासून मुक्त झालेले हवे आहे. बदाख्शान ते निमरोझ आणि हेरात ते कंदाहारपर्यंत प्रत्येक अफगाणी नागरिकाबरोबर भारत ठामपणे उभा आहे. अफगाणी जनतेचा निर्धार आणि संयम याला भारताची कायम साथ मिळेल’, असे भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत व अफगाणिस्तानमधील मैत्री तसेच अफगाणिस्तानचा विकास कोणतीही बाह्य शक्ती रोखून धरू शकणार नाही, असा दृढ विश्‍वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दहशतवादाबाबत इशारा देताना त्यामागे केवळ संघटना अथवा व्यक्ती नाही तर संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याची जाणीव ठेवायला हवी, याकडे लक्ष वेधले. दक्षिण आशियाचे स्थैर्य व समृद्धीसाठी सार्वभौम आणि अखंड अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी दोन देशांमध्ये भारताकडून उभारण्यात येणार्‍या ‘शाहतूत डॅम प्रोजेक्ट’चा परस्पर सामंजस्य करार पार पडला. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हमीद अतमार यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

या करारानुसार, भारत अफगाणिस्तानची राजधानी काबुलजवळ धरण उभारणार असून त्याद्वारे काबुलमधील जनतेला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प भारताकडून अफगाणिस्तानच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या अर्थसहाय्याचा भाग मानला जातो. भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानला सुमारे तीन अब्ज डॉलर्सहून अधिक अर्थसहाय्य पुरविले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताने अफगाणिस्तानमधील १०० प्रकल्पांसाठी आठ कोटी डॉलर्सची घोषणा केली होती.

दोन दिवसांपूर्वी भारताने अफगाणिस्तानला कोरोना लसीचे पाच लाख डोसही पुरविल्याचे समोर आले आहे. भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोस अफगाणिस्तानला देण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरण सुरू होईल, अशी माहिती अफगाणी सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तानने या लसींसाठी भारताचे आभार मानले आहेत. तर अफगाणिस्तानला केलेल्या या सहकार्यामुळे भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव अधिकच वाढेल, अशी चिंता पाकिस्तान व्यक्त करीत आहे.

leave a reply