अफगाणिस्तानातील आत्मघाती स्फोटात चार जणांचा बळी

सिराजुद्दीन हक्कानीच्या जीवाला धोका

kabul blastकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात चार ठार तर 18 जण जखमी झाले. तालिबानच्या अंतर्गत सुरक्षा विभागातील प्रार्थनास्थळाला लक्ष्य करून हा स्फोट घडविल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तालिबानचा अंतर्गत सुरक्षामंत्री सिराजुद्दीन हक्कानी याच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात आहे.

बुधवारी दुपारी राजधानी काबुलमधील अतिसंरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात मोठा स्फोट झाला. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या तालिबानच्या अंतर्गत सुरक्षा विभागातील प्रार्थनास्थळात हा स्फोट झाला होता. आत्मघाती दहशतवाद्याने हा हल्ला घडविल्याची माहिती तालिबानने दिली. आत्तापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नसली तरी यासाठी ‘आयएस-खोरासन’वर संशय व्यक्त केला जातो.

तालिबानचा अंतर्गत सुरक्षामंत्री सिराजुद्दीन हक्कानी याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इमारतीत हा आत्मघाती स्फोट झाल्यामुळे तालिबान अस्वस्थ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या प्रचारकांना लक्ष्य करून प्रार्थनास्थळांमध्ये स्फोट घडविण्यात आले होते. पण आत्ता थेट सिराजुद्दीन हक्कानी याच्यासारख्या मोठ्या तालिबानी कमांडरला लक्ष्य केल्याचे दावे आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

leave a reply