तुर्कीबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीसमधील बहुराष्ट्रीय युद्धसरावात फ्रान्स व युएई सहभागी

अथेन्स – ‘मेड्युसा ट्रायलॅटरल एक्सरसाईज’ नावाच्या बहुराष्ट्रीय युद्धसरावाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यावर्षी या युद्धसरावात फ्रान्स व संयुक्त अरब अमिरात (युएई) हे देशदेखील सहभागी झाले आहेत. ग्रीसने भूमध्य सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी 2017 सालापासून इजिप्त व सायप्रसबरोबर ‘मेड्युसा ट्रायलॅटरल एक्सरसाईज’ सुरू केला होता. गेले काही महिने ग्रीस व तुर्कीमध्ये भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनावरून जबरदस्त तणाव असून, या पार्श्‍वभूमीवर तुर्कीविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या फ्रान्स व युएईचा या सरावातील समावेश लक्षवेधी ठरतो.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. इस्रायल, ग्रीस, सायप्रस व तुर्कीच्या सागरी हद्दीत हे साठे असून, त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणाऱ्या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यात तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनातही केले आहे. त्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी तुर्कीने या भागात सातत्याने युद्धसरावही केले होते.

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही हालचालींना वेग दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून ग्रीसने अमेरिका, फ्रान्स तसेच युएईबरोबर स्वतंत्ररित्या संरक्षण सराव केले आहेत. त्याचवेळी या देशांबरोबरील सहकार्य वाढवून संरक्षणसिद्धतेसाठीही पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच ग्रीस व युएईमध्ये व्यापक संरक्षण सहकार्य करारही झाला होता. हा तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी सहकारी देशांबरोबर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जाते. यावर्षीच्या ‘मेड्युसा ट्रायलॅटरल एक्सरसाईज’मध्ये फ्रान्स व युएईने सहभागी होणे हे ग्रीसच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संकेत ठरतात.

सोमवारपासून इजिप्तच्या अलेक्झांड्रियानजिक सुरू झालेल्या बहुराष्ट्रीय सरावावर तुकीॅकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तुर्कीविरोधात एकत्र येणाऱ्या देशांनी पुन्हा एकदा नव्या सरावाला सुरुवात केली आहे. भूमध्य सागरातील हा सराव तणावात अधिकच भर टाकणारा आहे. 6 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावातून भूमध्य सागरी क्षेत्रात कोणाला शांतता व चर्चा नको आहे, हे स्पष्ट दिसून येते’, अशा शब्दात तुर्कीच्या संरक्षण विभागाने आपली नाराजी व्यक्त केली. सरावाचे चार भाग असून त्यात ‘सर्च ॲण्ड रेस्क्यू’, ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’, ‘सरफेस एक्सरसाईजेस’ व ‘नॅव्हल फॉर्मेशन्स’ यांचा समावेश आहे.

दरम्यान, भूमध्य सागरी क्षेत्रात सुरू झालेला बहुराष्ट्रीय सराव व युरोपिय महासंघाची संभाव्य बैठक या पार्श्‍वभूमीवर तुर्कीने आपले ‘ओरुक रेईस’ हे जहाज पुन्हा माघारी बोलावल्याची माहिती उघड झाली आहे.

leave a reply