‘आयएस’विरोधी संघर्षासाठी फ्रान्सची इराकमधील सैन्यतैनाती कायम राहिल

- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा

बगदाद – “‘आयएस’ संपलेली नाही व म्हणूनच या दहशतवादी संघटनेपासून असलेला धोकाही टळलेला नाही. सर्वच देशांनी या धोक्याविरोधात अधिक सावध राहून आयएसविरोधी लढ्याला प्राधान्य द्यायला हवे”, असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले. अमेरिकेने इराकमधून सैन्यमाघार घेतली, तरी फ्रान्सचे जवान यापुढेही इराकमध्येच तैनात असतील, असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ठासून सांगितले. इराकमधल्या बैठकीत ही घोषणा करून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानविषयक भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

इराकच्या सरकारने क्षेत्रीय बैठकीचे आयोजन केले आहे. फ्रान्स या बैठकीचा सहआयोजक आहे. या बैठकीच्या माध्यमातून फ्रान्सने इराकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि इराकच्या प्रगतीसाठी या क्षेत्रातील देशांना आवाहन केले. या बैठकीत सौदी अरेबिया व इराण या कट्टर प्रतिस्पर्धी देशांबरोबरच इजिप्त, जॉर्डन, कतार या देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच परराष्ट्रमंत्री उपस्थित होते. या बैठकीत इराकच्या विकासाच्या मुद्याबरोबरच दहशतवादविरोधी संघर्षावरही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका मांडली.

आयएस, दहशतवादविरोधी संघर्षावर बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. ‘इराकमधील सैन्यतैनातीवर अमेरिका कोणता निर्णय घेणार, हा त्यांचा प्रश्‍न आहे. पण दहशतवादविरोधी संघर्षासाठी फ्रान्सचे जवान यापुढेही इराकमध्ये तैनात असतील’, असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले. त्याचबरोबर ‘इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया-आयएस’ ही दहशतवादी संघटना अजूनही संपलेली नाही असून सांगून या दहशतवादी संघटनेपासून असलेला धोकाही कायम असल्याचे मॅक्रॉन यांनी अधोरेखित केले.

त्याचबरोबर या क्षेत्रातील सर्वच देशांनी या धोक्याविरोधात अधिक सावध राहून ‘आयएस’विरोधी लढ्याला प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन मॅक्रॉन यांनी केले. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनीही दहशतवादविरोधी संघर्षात फ्रान्स हा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बायडेन प्रशासनाच्या भूमिकेवर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. अफगाणिस्तानातील हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला अमेरिकेची माघार जबाबदार असल्याचा आरोप मॅक्रॉन यांनी केला होता. तर काही दिवसांपूर्वी जी7च्या बैठकीतही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर ताशेरे ओढले होते. तालिबानने अफगाणिस्तानवर मिळविलेल्या नियंत्रणाची नैतिक जबाबदारी अमेरिकेने स्वीकारावी, असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी फटकारले होते.

व्हाईट हाऊसने आपल्या अधिकृत निवेदनात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर केलेल्या या टीकेचा उल्लेख केला होता. पण माध्यमांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर व्हाईट हाऊसने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख वगळून नवे निवेदन प्रसिद्ध केले. त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील सूचक शब्दात बायडेन यांना लक्ष्य केल्याच्या बातम्या ब्रिटीश माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. यामुळे बायडेन प्रशासनाच्या अफगाण भूमिकेबाबत युरोपिय मित्रदेश नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इराकमधील बैठकीचा वापर करून अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघार आणि आयएसविरोधी धोरणावर हल्ला चढविल्याचे दिसत आहे.

leave a reply