रशियापेक्षा अमेरिकेला चीनच्या अण्वस्त्रांपासून अधिक धोका

- अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा

वॉशिंग्टन – अण्वस्त्रांबाबत चीनकडून करण्यात येणारे दावे विश्‍वासार्ह नाहीत आणि गैरसमज झाल्यास त्यावर तोडगा काढणारी यंत्रणाही उपलब्ध नसल्याने चीनच्या अण्वस्त्रांचा धोका रशियाहून अधिक असेल, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल थॉमस बुसिअर यांनी दिला. अमेरिकेच्या लष्करानेही चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांबाबत अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात चीनची संरक्षणदले सर्वाधिक गुंतवणूक अण्वस्त्रक्षमता वाढविण्यासाठी करीत आहेत, असे बजावण्यात आले आहे.

चीनच्या अण्वस्त्रांबाबत गेल्या काही महिन्यात सातत्याने चिंताजनक अहवाल समोर येत आहेत. जून महिन्यात, ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’(सिप्री) या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, चीनकडे 350 अण्वस्त्रे असल्याची नोंद आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वेगाने वाढ करीत असून आधुनिकीकरणाची प्रक्रियाही सुरू असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात बजावण्यात आले होते. त्यानंतर गेल्याच महिन्यात, अमेरिकी अभ्यासगट ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्‌’ने यासंदर्भातील नवा अहवाल प्रसिद्ध केला. यात चीनकडून झिंजिआंग प्रांताच्या पूर्व भागात अण्वस्त्रांसाठी आवश्‍यक असणाऱ्या जवळपास 110 ‘सिलोस’ची उभारणी सुरू झाल्याचा इशारा दिला आहे. या अभ्यासगटाने चीनच्या हालचालींचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते. चीनने यापूर्वी उभारणी व बांधकाम सुरू असलेल्या ‘सिलोस’ची संख्या लक्षात घेता चीनकडील अण्वस्त्रांची संख्या 400 ते 900च्या मध्ये असावी, असे या अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे.

त्यानंतर आता अमेरिकी लष्कराने ‘चायनीज टॅक्टिक्स’ नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाताही चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. चीनचे उघड आण्विक धोरण ‘मिनिमल डिटरन्स ॲप्रोच’चे असले, तरी चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ अण्वस्त्रांच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करीत आहे. अण्वस्त्रांशी संबंधित कोणत्याही करारावर चीनने स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे छोट्या तसेच मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी चीन मोकळा आहे, ही बाब अमेरिकी लष्कराच्या अहवालाने निदर्शनास आणून दिली.

चीनकडून अण्वस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू असल्याचा इशारा ‘चायनीज टॅक्टिक्स’ या अहवालाने दिला आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रांची जबाबदारी असणाऱ्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’नेही चीनच्या आण्विक धोक्याची जाणीव करून दिली. ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल थॉमस बुसिअर यांनी, चीनची अण्वस्त्रे रशियाच्या आण्विक धोक्यांपेक्षा अधिक घातक ठरतील, असे बजावले आहे. यात चिनी अण्वस्त्रांच्या फक्त आकडेवारीचा संबंध नसून चीनकडून अण्वस्त्रांची तैनाती ज्या प्रकारे करण्यात येत आहे, तेदेखील धोकादायक असल्याचा इशारा लेफ्टनंट जनरल थॉमस बुसिअर यांनी दिला. अण्वस्त्रांच्या मुद्यावर बोलण्यासाठी अमेरिका व चीनमध्ये स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही चीनच्या आण्विक धोक्याचा उल्लेख केला होता. ‘गेली अनेक दशके चीनने अण्वस्त्रांच्या बाबतीत किमान पातळीवर प्रतिबंधाचे धोरण राबविले होते. मात्र आता चीनच्या राजवटीने त्या धोरणापासून फारकत घेतल्याचे दिसत आहे. चीन गेल्या काही वर्षात अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढविली आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली होती.

leave a reply