बैरुत स्फोटाची पाहणी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष लेबेनॉनमध्ये दाखल

बैरुत – लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या १५७ वर पोहोचली असून पुढच्या काही तासात ही संख्या वाढू शकते, अशी चिंता लेबेनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली. लेबेनॉनला हादरवून सोडणार्‍या या स्फोटाची पाहणी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन गुरुवारी बैरुतमध्ये दाखल झाले. यावेळी संतप्त लेबेनीज नागरिकांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना गराडा घालून लेबेनॉनमध्ये सत्ताबदल घडविण्याची मागणी केली. दरम्यान, बैरुत स्फोटामागे हिजबुल्लाहचे कनेक्शन असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करू लागली आहेत.

Bairut-Blastबैरुत बंदरातील स्फोटामुळे किमान ३०० मीटर परिसरातील गोदामे भुईसपाट झाल्या आहेत. येथील ढिगार्‍याखाली अनेकजण गाडले किंवा अडकले गेल्याची भीती लेबेनीज आरोग्य मंत्रालय व्यक्त करीत आहे. त्यामुळे येथील ढिगारा उपसताच बळींची संख्या वाढेल, असा दावा येथील यंत्रणा करीत आहेत. या स्फोटात जखमी झालेल्यांची संख्या पाच हजारांवर गेली असून रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे कार पार्किंगमध्ये जखमींवर उपचार केले जात आहेत. या स्फोटानंतर जगभरातून लेबेनॉनमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

फ्रान्स, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, कतार, तुर्की या देशांनी वैद्यकीय सहाय्याने भरलेली विमाने लेबेनॉनमध्ये दाखल झाली आहेत. त्याचबरोबर काही देशांनी लेबेनॉनसाठी वैद्यकीय सहाय्याबरोबरच आर्थिक सहाय्य देखील घोषित केले आहे. चीनने सदर बंदराचा विकास करुन देण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. या स्फोटामुळे किमान तीन लाख जण बेघर झाले असून लेबेनॉनच्या अर्थव्यवस्थेला १५ ते २० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने लेबेनॉनवर टाकलेले निर्बंध काढावे, अशी मागणी इराणने केली आहे.

Bairut-Blastमात्र लेबेनॉनच्या भ्रष्ट नेत्यांवर टाकलेले निर्बंध शिथिल न करता, या भ्रष्टाचारी नेत्यांच्या हातात पैसा न जाता, बैरुतच्या पीडितांना सहाय्य केले जाईल, अशी घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे देखील गुरुवारी सकाळी बैरुतमध्ये पोहोचले आहेत. यावेळी स्थानिक जनतेने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना गराडा घालून आपल्या देशात क्रांति घडविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर लेबेनीज जनतेला देशातील राजवट उलथून टाकायची आहे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. लेबेनीज जनतेने आपल्या देशातील असुरक्षितता आणि अस्थैर्यासाठी सरकारलाच दोषी धरले आहे.

या स्फोटाशी संबंधित बैरुत बंदरातील सर्व अधिकार्‍यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अमोनियम नायट्रेट असुरक्षितरित्या गोदामात साठविल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे लेबेनीज सरकारने जाहीर केले. पण गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी सरकारबरोबर पाठपुरावा सुरू होता. मात्र सरकारी यंत्रणांनीच अमोनियम नायट्रेटच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रतिक्रीया दिली नसल्याचे, बंदराच्या कस्टम अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बैरूत स्फोटाप्रकरणाचे धागेदोरे हिजबुल्लाहपर्यंत जात असल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्रे करीत आहेत. बैरुत स्फोटासाठी कारणीभूत असलेला २७५० टन अमोनियम नायट्रेटचा साठा आणि हिजबुल्लाह यांचा संबंध युरोपमधील दहशतवादी कटाशी जोडलेला असल्याचे या वर्तमानपत्रांचे म्हणणे आहे. २०१५ साली लंडनमधील एका गोदामात हिजबुल्लाहने तीन टन अमोनियम नायट्रेटचा साठा लपविला होता. ब्रिटनमध्ये मोठा हल्ला चढविण्याची योजना हिजबुल्लाहने आखली होती. पण ’एमआय-५’ने वेळीच कारवाई करुन सदर साठा आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते.

तर या वर्षी एप्रिल महिन्यात जर्मनीमध्ये देखील शेकडो किलो वजनाचा अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला होता. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने दिलेल्या माहितीच्या आधारावर जर्मन यंत्रणांनी ही कारवाई केली होती. या दोन्ही घटनांची आठवण इस्रायली वर्तमानपत्रे करुन देत आहेत. त्यामुळे हिजबुल्लाहकडे अमोनियम नायट्रेटचा साठा होता, असा आरोप सदर वर्तमानपत्रे करुन देत आहेत. तर काही महिन्यांपूर्वी हिजबुल्लाहने इस्रायलच्या हैफा शहरातील अमोनियम नायट्रेटचा साठा केलेले टॅंक उडवून देण्याची धमकी दिली होती, याकडेही इस्रायली वर्तमानपत्राने लक्ष्य वेधले.

leave a reply