रशिया, चीन दररोज अमेरिकी उपग्रहांना लक्ष्य करीत आहेत

- ‘स्पेस फोर्स’चे जनरल थॉम्पसन यांचा आरोप

वॉशिंग्टन – रशिया व चीन दररोज अंतराळातील अमेरिकी उपग्रहांना लक्ष्य करीत आहे. अमेरिकी उपग्रहांवर हल्ले करण्यासाठी जॅमर्स, लेझर्स तसेच सायबरहल्ल्यांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चे वरिष्ठ अधिकारी जनरल डेव्हिड थॉम्पसन यांनी केला. अमेरिकेच्या अंतराळातील यंत्रणांना मोठा धोका निर्माण झाल्याकडेही जनरल थॉम्पसन यांनी लक्ष वेधले. गेल्याच महिन्यात रशियाने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी करून खळबळ उडवली होती.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत‘स्पेस फोर्स’मध्ये ‘व्हाईस चीफ ऑफ स्पेस ऑपरेशन्स’ पदावर असणार्‍या थॉम्पसन यांनी अंतराळातील चीनच्या वाढत्या कारवायांची जाणीव करून दिली. ‘अंतराळक्षेत्रातील क्षमतांचा विचार करता चीन रशियाच्या खूपच पुढे गेला आहे. चीन अत्यंत वेगाने अंतराळात विविध क्षमता असणार्‍या यंत्रणा तैनात करीत आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत चीन अंतराळक्षेत्रातील आघाडीची सत्ता बनलेला असेल’, असा इशारा जनरल डेव्हिड थॉम्पसन यांनी दिला.

चीन तसेच रशिया अमेरिकेच्या उपग्रहांवर दररोज हल्ले चढवित असून त्यासाठी लेझर्स व ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमर्स’सह सायबरहल्ल्यांचाही वापर करण्यात येत आहे, याकडे अमेरिकी अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. अंतराळक्षेत्रातील क्षमतांच्या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर असली तरी चीन व रशिया अत्यंत वेगाने आपल्याला गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ही अत्यंत चिंतेची बाब ठरते, असे जनरल थॉम्पसन यांनी बजावले.

रशिया व चीनच्या अंतराळातील वाढत्या कारवायांवरून गेली काही वर्षे सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. या दोन्ही देशांनी अंतराळातील युद्धासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे अमेरिका, ब्रिटन तसेच नाटोकडून सांगण्यात आले आहे. रशिया व चीनने ‘सॅटेलाईट ड्रिस्टॉयिंग टेक्नॉलॉजी’ विकसित केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. अमेरिकेतील एका आघाडीच्या विश्‍लेषकांनी चीनच्या वाढत्या क्षमता व कारवायांमुळे पुढील ९/११ अंतराळक्षेत्रात घडेल, असेही बजावले होते.

मात्र जनरल थॉम्प्सन यांनी अमेरिकी उपग्रहांवर दररोज हल्ले होत असल्याचा उल्लेख करणे रशिया व चीनच्या अंतराळातील कारवायांची वाढती व्याप्ती दाखवून देणारे ठरते.

leave a reply