आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर अधिकच कडाडतील

- गोल्डमन सॅक्सचा इशारा

वॉशिंग्टन – पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध व ओपेक प्लस देशांकडून इंधनाच्या उत्पादनात झालेली घट, यामुळे येत्या वर्षअखेरीपर्यंत इंधनाचे दर पुन्हा १०० डॉलर्सच्या पुढे जातील, असा इशारा अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने दिला. चीनमधील इंधनाची वाढती मागणी देखील इंधन दरवाढीसाठी सहाय्यक ठरतील, असा दावा या वित्तसंस्थेने केला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर बॅरलमागे ८० डॉलर्सच्या आसपास आहेत.

अमेरिकेत तळ असलेली गोल्डमन सॅक्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीची गुंतवणूक व सिक्युरिटीज्‌‍ व्यवस्थापन करणारी वित्तसंस्था आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील सरकार, वित्तीय संस्था, कॉर्पोरेशन आणि अतिश्रीमंतांना आर्थिक गुंतवणुकीबाबतचे सल्ले तसेच इतर वित्तीय सेवा देण्याचे काम गोल्डमन सॅक्स करते. गेल्या १५० वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या सदर वित्तसंस्थेचे अमेरिकेपासून जगभरातील विकसित, विकसनशील देश तसेच जगातील आघाडीचे व्यावसायिक क्लायंट्स आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण व घडामोडींचा जागतिक बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांचे भाकित सदर वित्तसंस्था करते. त्यामुळे गोल्डमन सॅक्सने केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहिले जाते.

दोन दिवसांपूर्वी या वित्तसंस्थेतील वरिष्ठ विश्लेषक जेफ्री क्युरी यांनी सौदी अरेबियामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या घसरत्या उत्पादकतेवर चिंता व्यक्त केली. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियन इंधनाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा बाधित झाला आहे. त्याचबरोबर ओपेक प्लसच्या देशांनी देखील इंधनाचे उत्पादन वाढविण्यास नकार दिला आहे. याचा एकत्रित परिणाम जागतिक बाजारातील इंधनाच्या दरावर होईल व येत्या वर्षअखेरीपर्यंत इंधनाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्याही पुढे जातील, असे जेफ्री क्युरी यांनी बजावले.

रशियावरील निर्बंध, इंधनाच्या उत्पादनातील घट आणि चीनमधील इंधनाची मागणी वाढली तर २०२४ सालच्या सुरुवातीला याहून अधिक भयावह समस्या निर्माण होईल, असा इशारा क्युरी यांनी दिला. इंधनाच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी इंधनाची उत्पादकता वाढवावी लागेल. या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत इंधनाची मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील तुटवडा हे गुणोत्तर बदलावे लागेल, असेही क्युरी यांनी सुचविले. सौदीचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांनी देखील पाश्चिमात्य देशांनी रशियावर टाकलेल्या निर्बंधांचे भीषण परिणाम होतील, असा इशारा दिला.

leave a reply