चीनच्या युआनमुळे अमेरिकेच्या डॉलरचे स्थान धोक्यात आले आहे

- विख्यात अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांचा इशारा

लंडन – आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकेच्या डॉलरचे स्थान चीनच्या युआनमुळे धोक्यात आलेले आहे. पुढच्या काळात युआन देखील आंतरराष्ट्रीय चलन बनेल. डॉलरचा राजकीय हत्यार व राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर करण्याच्या अमेरिकेच्या धोरणांचा लाभ युआनला होईल, असा दावा विख्यात अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांनी केला. पुढच्या दशकात जग दोन चलनांमध्ये विभागलेले असेल, असे सांगून रुबिनी यांनी आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरची एकाधिकारशाही संपुष्टात येणार असल्याचे भाकित वर्तविले आहे.

२००८ साली अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीची पूर्वसूचना देणारे द्रष्टे अर्थतज्ज्ञ अशी नॉरियल रुबिनी यांची ख्याती आहे. यामुळेच त्यांना डॉक्टर डूम म्हटले जाते. ब्रिटनच्या एका वर्तमानपत्रासाठी नुकत्याच लिहिलेल्या लेखात रुबिनी यांनी आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलरचे भवितव्य धोक्यात आल्याचा इशारा दिला. चीनचे चलन युआन डॉलरची जागा घेऊ शकेल, असे रुबिनी यांनी बजावले आहे. मात्र हा बदल सोपा नसून चीनच्या चलनव्यवस्थेत आणि धोरणातील दोषांवरही रुबिनी यांनी बोट ठेवले आहे. चीन भांडवलावर सरकारी नियंत्रण ठेवण्यासारखे, आपल्या अर्थव्यवस्थेबद्दलची खरीखुरी माहिती उघड करीत नाही व युआनच्या विनिमय दराबाबत लवचिक धोरण स्वीकारत नाही, तोवर युआन खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय चलन बनू शकणार नाही, असे रुबिनी म्हणाले.

मात्र युआनला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता मिळण्याच्या आड येणाऱ्या या साऱ्या गोष्टी बाजूला पडतील, अशी परिस्थिती अमेरिकेच्या धोरणांमुळे निर्माण झालेली आहे, याची परखड जाणीव नॉरियल रुबिनी यांनी करून दिली. अमेरिकेने आपल्या शत्रूंना धडा शिकविण्यासाठी निर्बंध लादून त्यासाठी डॉलरचा हत्यारासारखा वापर सुरू केला आहे. आपल्या शत्रूदेशांना डॉलरचा वापर करता येऊ नये, यासाठी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचे उलटे परिणाम समोर येत आहेत. यामुळे रशिया, इराण व उत्तर कोरिया सारख्या देशांचा प्रबळ गट तयार होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरचे स्थान धोक्या आले असून पुढच्या काळात युआन डॉलरची जागा घेऊ शकेल, असा दावा नॉरियल रुबिनी यांनी केला.

नव्याने उदयाला येत असलेले जगातील काही देश डॉलरपेक्षा चीनच्या युआनचा वापर करतील. युआनमध्येही इंधनाची खरेदी करता येते, हे लक्षात आल्यानंतर या चलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधिकच वाढेल, असा दावा रुबिनी यांनी केला.

सध्या सौदी अरेबिया युआनमध्ये इंधनाची विक्री करण्याबाबत चीनची चर्चा करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा अमेरिकेच्या पेट्रोडॉलरला बसलेला फार मोठा धक्का असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. इंधनाची खरेदी करण्याची क्षमता असलेले चलन म्हणूनच डॉलरला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती. म्हणूनच याचा उल्लेख पेट्रोडॉलर असा केला जातो. हे स्थान चीनच्या युआनमुळे धोक्यात येत असल्याची सुस्पष्ट जाणीव नॉरियल रुबिनी यांनी करून दिलेली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने उघडपणे देखील याच शब्दात डॉलरचे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून असलेले स्थान धोक्यात आल्याचा इशारा दिला होता. अमेरिकेचेच अर्थतज्ज्ञ त्याला दुजोरा देत असून डॉलरचा शस्त्रासारखा वापर करण्याचे प्रयत्न आपल्याच देशावर उलटत असल्याचे या अर्थतज्ज्ञांनी बजावले होते.

leave a reply