ग्राहकांच्या घबराहटीमुळे ब्रिटनमध्ये इंधन टंचाई

- पंतप्रधान बोरिस जॉन्सन लष्कर तैनात करण्याची शक्यता

इंधन टंचाईलंडन – ब्रेक्झिटच्या निर्णयाचे परिणाम ब्रिटनच्या इंधनक्षेत्रावर दिसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ब्रिटनमध्ये इंधनाची टंचाई जाणवू लागली असून पेट्रोलपंपच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ब्रिटनमधील सुमारे दोन तृतियांश पेट्रोलपंपातील इंधनाचा साठा संपला असून इतर पेट्रोलपंपवर इंधनासाठी ग्राहकांमध्ये हाणामारी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. परिस्थिती चिघळू नये यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन वेगाने पावले उचलत असून पंतप्रधान जॉन्सन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर तैनात करण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार असल्याचे, ‘ब्रेक्झिट’चे निश्‍चित झाले. याचा थेट परिणाम ब्रिटनच्या उद्योग तसेच संबंधित क्षेत्रावर झाला. बेक्झिटमुळे ब्रिटनने ७२ हजार ट्रक चालक तर सव्वा लाखांहून अधिक युरोपिय नागरिक गमावले. यापैकी ट्रक चालकांच्या कमतरतेमुळे ब्रिटनमधील मालवाहतुकीवर परिणाम झाला व याचा फटका ब्रिटनच्या इंधनवाहतुकीवर झाल्याचा दावा केला जातो.

इंधन टंचाईट्रक चालकांची ही कमतरता भरुन काढण्यासाठी ब्रिटनने काही पावले उचलली. पण इंधनासह इतर मालवाहतूक यामुळे प्रभावित झाली व त्याचा परिणाम इंधनाच्या तुटवड्यावर झाल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे, विश्‍लेषक करीत आहेत. देशातील मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी ब्रिटनचे सरकार सुमारे पाच हजार परदेशी ट्रकचालकांना वर्क व्हिसा देण्याची तयारी करीत आहेत. १ ऑक्टोबर ते २४ डिसेंबरपर्यंतच हा व्हिसा ग्राह्य असेल.

पण तोपर्यंत ब्रिटनच्या पेट्रोलपंपावर इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचा दावा केला जातो. ब्रिटनमधील सुमारे ५,५०० पेट्रोलपंपातील दोन तृतियांश पेट्रोलपंपाबाहेर ‘नो फ्युएल’चे बोर्ड लागले आहेत. तर उर्वरित पेट्रोलपंपांबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. वेळीच इंधनाची कमरता भरून काढली नाही तर, येत्या काही दिवसात सदर पेट्रोलपंप देखील बंद करावे लागतील, असा इशारा दिला जातो. फक्त इंधनाबाबतच नाही तर इतर आवश्यक मालवाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विचार व्हावा, अशी मागणी ब्रिटिश नागरिक करीत आहेत.

leave a reply