तालिबानची ताजिकिस्तानला धमकी

- तालिबानने ताजिक सीमेजवळ हजारो दहशतवादी रवाना केले

दहशतवादी रवानाकाबुल – ‘ताजिकिस्तान आमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करीत आहे. ताजिकिस्तानने वेळीच अफगाणिस्तानातील दखलंदाजी थांबवावी, अन्यथा ताजिकिस्तानच्या प्रत्येक कृतीला प्रत्युत्तर मिळेल’, असा इशारा तालिबानचा उपपंतप्रधान मुल्ला बरादर याने दिला. बरादरचा हा इशारा प्रसिद्ध होण्याआधीच तालिबानने ताजिक सीमेजवळ हजारो दहशतवादी रवाना केले आहेत. यामध्ये आत्मघाती हल्लेखोर असल्याचा दावा काही माध्यमे करीत आहेत.

गेले काही दिवस कंदहारमध्ये असलेल्या मुल्ला बरादर या तालिबानी नेत्याची मुलाखत आखाती वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली. यामध्ये तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बरादर याने ताजिकिस्तानला धमकावले आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील ताजिकिस्तान हा आपल्या देशात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप मुल्ला बरादरने केला. तालिबानचा विरोधक असलेल्या ताजिकिस्तानच्या सरकारने अफगाणिस्तानातील हस्तक्षेप रोखावा अन्यथा त्याच्या परिणामांसाठी तयार रहावे, असे बरादरने धमकावल्याचा दावा केला जातो.

दहशतवादी रवानामुल्ला बरादरची ही धमकी प्रसिद्ध होण्याच्या दोन दिवस आधीच तालिबानने ‘मन्सूरी इस्लामिक एमिरात आर्मी’तील हजारो दहशतवादी ताजिकिस्तानच्या सीमेजवळ रवाना केले. तालिबानचा प्रवक्त झबिउल्ला मुजाहिद याने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. ताजिकिस्तान सीमेजवळील अफगाणिस्तानच्या तखर प्रांतात ही तैनाती केल्याचे मुजाहिदने म्हटले होते. ताजिकिस्तानच्या लष्करापासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, ही तैनाती केल्याचा दावा मुजाहिदने केला होता.

तालिबानच्या या तैनातीवर काही स्थानिक माध्यमांनी चिंता व्यक्त केली आहे. तालिबानने ताजिक सीमेजवळ तैनात केलेल्या दहशतवाद्यांमध्ये आत्घाती हल्लेखोर असल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. तालिबानमधील ‘मन्सूरी’ गट हा आत्मघाती हल्ल्यांसाठी ओळखला जातो. त्यामुळे अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देणार नसल्याची भूमिका घेणारे ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एमोमाली रहमान यांना धडा शिकविण्यासाठी तालिबान सीमेजवळ आत्मघाती हल्ले चढवू शकतो, असा दावा ताजिक रेडिओवाहिनीने केला.

दरम्यान, ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी उघडपणे तालिबानविरोधात भूमिका स्वीकारली आहे. अफगाणिस्तानातील ताजिक अल्पसंख्यांकांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करणार्‍या तालिबानच्या राजवटीला कदापि मान्यता देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर तालिबानविरोधात लढणार्‍या अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह यांच्या नॉर्दन अलायन्सला ताजिकिस्तानचे समर्थन असल्याचा दावा केला जातो. पंजशीरमधील संघर्षात ताजिकिस्तानने नॉर्दन अलायन्सला लष्करी सहाय्य पुरविल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला होता.

leave a reply