‘ॲपल’चे आठ उत्पादन कारखाने चीनमधून भारतात

- केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली – भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येत आहे. पहिल्यांदाच ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चर इकोसिस्टम’साठी चीनला पर्याय असावा याची जाणीव जगाला झाली आहे. त्यामुळे भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ‘ॲपल’ फोनची निर्मिती करणारे आठ कारखाने चीन सोडून भारतात स्थापन झाले आहेत, याकडे रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले.

उत्पादन

बिहारमधील अनिवासी भारतीयांशी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी जगात भारताच्या बदलत असलेल्या प्रतिमेची माहिती दिली. लडाखमध्ये चीनने काढलेल्या कुरापतीनंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला साऱ्या जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी भारताचे समर्थन केले आहे. भारत आपल्या सार्वभौमत्वाशी व अखंडतेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.

उत्पादनजगातील मोठ्या कंपन्या आता चीनबाहेर आपले कारखाने हलवीत आहेत. चीन व्यतिरिक्त अन्य पर्याय असावेत, असे प्रथमच ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम’ला वाटू लागले आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ”कित्येक कंपन्या चीन बाहेर पडत असून काही कंपन्यांनी पर्याय म्हणून भारताची निवड केली आहे. सॅमसंग भारतात आधीपासून उत्पादन घेत आहे. मात्र सॅमसंग आता भारतात आपला विस्तार वाढवत आहे. तसेच ॲपल फोनची निर्मिती करणारे आठ कारखाने चीनमधून हलवून भारतात सुरु झाले आहेत. यावरून जागतिक उत्पादन कंपन्यांना भारताच्या बाजारपेठेचे महत्व पटले आहे हे स्पष्ट होते,” असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.

2014 साली भारतात केवळ दोन मोबाईल कारखाने होते. मात्र आता देशात मोबाईल उत्पादन कारखान्यांची संख्या वाढून २५० च्या पुढे गेली आहे. उत्पादनाला प्रोत्साहन देण्याबरोबर सरकारने आत्मनिर्भर भारत मोहीम लॉन्च केली आहे. जागतिक कंपन्यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आत्मनिर्भर अभियान म्हणजे स्वतःला वेगळे करणे असा अर्थ नाही. तर भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आपली आर्थिक क्षमता वाढवीत आहे, असा याचा अर्थ होतो, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

leave a reply