भविष्यातील युद्ध ‘हायब्रिड वॉरफेअर’ असेल

- भारताच्या वायुसेनाप्रमुखांचा इशारा

‘हायब्रिड वॉरफेअर’ नवी दिल्ली – भविष्यातील युद्ध हे हायब्रिड वॉरफेअर असेल व त्यात कॉम्प्युटर व्हायरसपासून ते हायपरसोनिक क्षेपणास्त्रांपर्यंतच्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर होईल, असा इशारा भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिला. सायबरक्षेत्र व माहितीचा वापर हे युद्धभूमीला आकार देणारे आधुनिक घटक असल्याचा दावाही वायुसेनाप्रमुखांनी केला. शत्रूवर परिणाम व्हावा यासाठी माहितीचा आधार घेऊन तयार केलेली एखादी गोष्ट (नॅरॅटिव्ह) जबरदस्त धक्का देणारी ठरु शकते, याकडेही एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी लक्ष वेधले.

‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’ने (एआयएमए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान वायुसेनाप्रमुखांनी भविष्यातील युद्धाची चौकट बदलत असल्याची जाणीव करुन दिली. ‘मानव विविध माध्यमांमधून परस्परांशी अधिकाधिक जोडला जात आहे. संरक्षणदलांच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सवर झालेला एखादा सायबरहल्ला कमांड व नियंत्रण ठेवणार्‍या रचनेला उद्ध्वस्त करु शकतो’, असा दावा वायुसेनाप्रमुखांनी केला.

पुढील युद्धात आपला शत्रू एखादा देश किंवा संघटना नसण्याची शक्यता आहे, याची जाणीव एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी करून दिली. ‘डीडीओएस’ प्रकारातील सायबरहल्ल्यांमागे नक्की कोण आहे आणि तो केव्हा व कुठून झाला आहे, याची माहिती आपल्याला कदाचित कधीच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. भविष्यात भारतावर सर्व आघाड्यांवरून हल्ला होऊ शकतो, असेही वायुसेनाप्रमुखांनी यावेळी बजावले.

आर्थिक स्तरावर करण्यात आलेली गळचेपी, राजनैतिक स्तरावर एकटा पाडण्याचे प्रयत्न, ‘इन्फोर्मेशन ब्लॅकआऊट’ अशा कोणत्याही प्रकारे भारताला लक्ष्य केले जाऊ शकते. पहिली गोळी झाडली जाण्यापूर्वी किंवा लढाऊ विमानाने सीमेपलिकडे झेप घेण्यापूर्वी हे घडू शकते, याकडे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी लक्ष वेधले. भविष्यातील युद्ध हे हायब्रिड असेल व त्यात सर्वच क्षेत्रांचा समावेश असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

leave a reply