जी२० देशांनी जागतिक आव्हानांविरोधात सहकार्य करावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra-Modiनवी दिल्ली – आपल्या मतभेदांपेक्षा आपल्याला एकत्र आणणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी२० परिषदेला दिला. नवी दिल्लीत सुरू असलेल्या या परिषदेत अमेरिका व पाश्चिमात्य देशांचा गट युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाचा निषेध करण्याची मागणी करीत आहे. संयुक्त निवेदनात रशियाच्या निषेधाचा मुद्दा असलाच पाहिजे, असे अमेरिका व पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे. तर रशिया आणि चीन याला कडाडून विरोध करीत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या पंतप्रधानांनी जी२० देशांनी आपली जबाबदारी ओळखून जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकजूट करावी, आवाहन या देशांना केले आहे. महात्मा गांधी व बुद्धाचा देश असलेल्या भारताची सभ्यता व परंपरा आपल्याला मतभेद विसरून, एकत्र आणणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्याचा संदेश देते. जगभरात तेढ माजलेली असताना आपण सारेजण भेटत आहोत, त्यामुळे जी२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरते. जगभरात सुरू असलेल्या तणावावर प्रत्येक देशाचे स्वतःचे असे धोरण असू शकते. पण जगभरातील पहिल्या २० क्रमांकाच्या अर्थव्यवस्था म्हणून इथे नसलेल्या देशांसाठीही काहीतरी करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बजावले.

आर्थिक उन्नती व विकास, संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आर्थिक स्थैर्य, अन्न व ऊर्जा सुरक्षा या साऱ्यांसमोरील आव्हानांचा दाखला यावेळी पंतप्रधानांनी दिला. तसेच देशांच्या सीमा न जुमानता गुन्हे करणाऱ्या टोळ्या, भ्रष्टाचार, दहशतवाद यांच्यापासून संभवत असलेल्या धोक्यांचाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र युक्रेनचे युद्ध किंवा अन्य वादग्रस्त मुद्यांचा थेट उल्लेख करण्याचे पंतप्रधानांनी टाळले. पण अमेरिका, ब्रिटन, युरोपिय महासंघाने युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाचा या परिषदेत निषेध करण्याचा हट कायम ठेवला आहे.

तर दुसऱ्या बाजूला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिका व पाश्चिमात्य देशांसह रशियाबाबत पूर्वग्रहदूषित भूमिका स्वीकारणाऱ्या माध्यमांवर जोरदार टीका केली. तर चीनला जी२० संयुक्त निवेदनात युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी आपण दिलेल्या प्रस्तावाचा समावेश संयुक्त निवेदनात करायचा आहे. हे सारे मतभेद दूर करून जी२० बैठकीत संयुक्त निवेदनासाठी एकमत घडवून आणण्याचे जोरदार राजनैतिक प्रयत्न भारत करीत आहे. पण सध्या तरी त्याला यश मिळण्याची शक्यता नाही.

leave a reply